घरमहाराष्ट्रनाशिकशेतकर्‍यांना सामाजिक पाठबळाची गरज; 'कृषीथॉन' उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांच प्रतिपादन

शेतकर्‍यांना सामाजिक पाठबळाची गरज; ‘कृषीथॉन’ उद्घाटनप्रसंगी पालकमंत्र्यांच प्रतिपादन

Subscribe

नाशिक : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकर्‍यांना वेगवेगळ्या प्रकारची मदत केली जाते. परंतु, तरीही शेतकर्‍यांच्या पिकाला भाव मिळत नाही. त्यासाठी त्याकरिता समाजातील सर्व घटकांनी शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे, कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना नवनवीन तंत्रज्ञान व उद्योग कृषीवर आधारित उद्योगांची माहिती पोहोचविण्याचा हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले.

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम येथे २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी भुसे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी खासदार देविदास पिंगळे, नाशिक अ‍ॅग्रो डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विजय नाना पाटील, पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक पुष्कर तराई आदी उपस्थित होते. व्यासपीठावर प्रदर्शनाचे आयोजक संजय न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, साहिल न्याहारकर, मीडिया एक्झिबिटर्सचे संचालक नितीन मराठे, रश्मी हिरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी दादा भुसे म्हणाले की, शेतीक्षेत्रात नवनवीन संशोधन होत असून ड्रोनद्वारे फवारणी, अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ व इतर आपत्तीप्रसंगी उपग्रहाच्या माध्यमातून मदत देण्याचे नियोजन राज्य सरकार पातळीवर केले जात आहे. नुकसानभरपाईदेखील या माध्यमातून देण्यात येणार आहे. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी कृषिथॉनची व्याप्ती वाढत असून देशातील एकूण कृषी प्रदर्शनापैकी तिसरे मोठे आणि राज्यातील दुसरे मोठे हे कृषीथॉन प्रदर्शन असल्याने आयोजकांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी पंजाब नॅशनल बँकेचे महाव्यवस्थापक पुष्कर तराई यांनीही शेतकर्‍यांना बँकेमार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रास्ताविक आयोजक साहिल न्याहारकर यांनी केले. न्याहारकर म्हणाले की, गेल्या २४ वर्षांपासून कृषीथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून शेतकर्‍यांना नवनवीन कृषी संशोधनाची माहिती मिळावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. या प्रदर्शनात सुमारे ३००पेक्षा जास्त स्टॉल असून ३०० पेक्षा जास्त कंपन्या यात सहभागी झाले आहेत. इतकेच नव्हे तर सुमारे ४५ हजार शेतकर्‍यांनी या प्रदर्शनासाठी नोंदणी केले असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत आयोजक साहिल न्याहारकर आणि अश्विनी न्याहारकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नितीन मराठे यांनी मानले. कार्यक्रमास शहरातील कृषी संबंधित उद्योग व व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -