घरमहाराष्ट्रनाशिकपंचनामे झालेल्या सर्व शेतकर्‍यांना पीकविमा रक्कम अदा करा

पंचनामे झालेल्या सर्व शेतकर्‍यांना पीकविमा रक्कम अदा करा

Subscribe

खासदार गोडसे यांच्या विमा कंपन्यांना सूचना

शेतकरी खेड्यात राहत असल्याने त्यांना ऑनलाईन अर्ज करण्याविषयी फारशी माहिती नसते. शिक्षण कमी असल्याने शेतकर्‍यांना विमा कंपन्यांच्या नियमांचे ज्ञान नसते. सरकारी प्रकियांची बरीचशी माहिती नसते. विमा कंपन्यांची नियमावली त्यांच्यापर्यंत पोहचत नसल्याने त्यांना वेळेत नियमांची माहिती मिळत नाही. अशावेळी जरी शेतकर्‍यांनी आपल्या पिकांच्या नुकसानीची वेळेत तक्रार विमा कंपनीकडे केलेली नसली, तरी महसूल विभागाकडून केल्या गेलेल्या पंचनाम्याच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने विम्याची रक्कम अदा करावी, अशा सूचना खासदार गोडसे यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना दिल्या आहे.

गेल्या वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान होवूनही विम्याची रक्कम न मिळालेल्या इगतपुरी तालुक्यातील शेतकर्‍यांची आणि भारत एक्सा या विमा कंपनीच्या अधिकार्‍यांची संयुक्तिक बैठक गुरुवारी इगतपुरी येथे पार पडली. यावेळी बोलतांना खासदार गोडसे यांनी पिकविमा कंपनीच्या अधिकार्‍यांना या सूचना केल्या. इगतपुरी तालुक्यातील शेतकर्‍यांच्या भातपिकांचे नुकसान होवून आठ महिने उलटले, तरी विमा कंपनीकडून त्यांना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने हजारो शेतकर्‍यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झालेले आहे. नुकसानग्रस्तांनी आपल्या नुकसानीचे ७२ तासांमध्ये कंपनीकडे ऑनलाईन तकार केली नसल्याचे कारण सांगत विमा कंपनीने हजारो शेतकर्‍यांचे क्लेम नाकारले आहेत. ऑनलाईन तकार केलेली नसली तरी शासनाच्या महसूल, कृषी विभागाकडून सर्वच नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे मात्र झालेले आहेत. त्यामुळे पंचनामे ग्राह्य धरून वंचित शेतकर्‍यांना विमा कंपनीकडून तातडीने विम्याची रक्कम अदा करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.

- Advertisement -

यावेळी तहसीलदार परमेश्वर कासुळे, शिवसेनेचे निवृत्ती जाधव, भगवान आडोळे, सोमनाथ जोशी, विमल तोकडे, बाळा गव्हाणे, कुलदीप चौधरी, राजू नाठे, रघुनाथ तोकडे, विठ्ठल लंगडे, राजू धोंगडे, अशोक सुरडे, नंदलाल बागडे आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -