मरळगोई येथील महिला सरपंचाची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

सासरच्या व्यक्तींनी शारीरिक व मानसिक छळ केल्याची पोलिसांत तक्रार

Yogita Fapale Sarpanch sucide
मरळगोई येथील महिला सरपंचाची आत्महत्या; पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा

लासलगाव – मरळगोई खुर्द ग्रामपंचायतच्या विद्यमान महिला सरपंच योगिता अनिल फापाळे यांनी मंगळवारी (दि.२२) त्यांच्या राहत्या घरी रात्री साडेआठदरम्यान विष घेऊन आत्महत्या केली. सरपंच झाल्यापासून सासरच्या कुटुंबियांकडून मानसिक व शारिरिक छळ सुरू असल्याने योगिता यांनी आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासरे, सासू व दीराविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

संतोष शांताराम गवळी (रा. मकरंदपूर, ता. कन्नड) यांनी याबाबत लासलगाव पोलिसांत तक्रार केली. सरपंच झाल्यापासून माझ्या बहिणीस कोणत्याही कारणावरून, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ करत होते. योगिताने सासरच्या छळाला कंटाळून विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून लासलगाव पोलिसांनी सासरे बाबासाहेब फापाळे, पती अनिल फापाळे, सासू सरला फापाळे आणि दीर प्रदीप फापाळे (सर्व रा. मरळगोइ खुर्द) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे करत आहे.