खड्डे बुजवा अन्यथा कंत्राटदारावर कारवाई; आयुक्त इन अ‍ॅक्शन

शहरातील रस्ते कामांची केली पाहणी

नाशिक : पावसाळयामुळे रस्त्यांना पडलेल्या खड्डयांमुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून याविरोधात राजकीय पक्षांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता नाशिक शहर खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी संबधित ठेकेदारांना तंबी देत खड्डे बुजवा अन्यथा थेट कारवाइचा इशाराच दिला आहे. दरम्यान आयुक्तांनी मंगळवारी शहरातील रस्ते कामांची पाहणी केली.

गेल्या आठवडयात झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्ते कामांचे पितळ उघडे पडले. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने रस्ते कामांचे पितळ उघडे पडले. रस्त्यांच्या कामानंतर पुढील तीन ते पाच वर्ष या रस्त्यांची देखभाल दुरूस्ती ही संबधित ठेकेदारानेच करणे बंधनकारक असतांना ठेकेदारांनी मात्र याकडे सोयीस्कर पाठ फिरवत नाशिककरांना अक्षरशः खड्डयात ढकलून दिले आहे. यामुळे दररोज खड्डयातून वाट काढतांना वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. याविरोधात राजकीय पक्षांनी आवाज उठवत महापालिकेने त्वरीत संबधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करत खड्डे बुजविण्याची मागणी केली.

शहरात २०० किलोमीटरचे रस्ते असून त्यात सुमारे ६ हजार खड्डे पडल्याचे पालिकेच्या एका सर्वेक्षणात समारे आले आहे. यात २६७० मोठे खड्डे आहेत. त्यामुळे आयुक्तांनी ठेकेदारांना खड्डे बुजविण्याचे आदेश देतांनाच कारवाईचा इशारा दिला आहे. त्यानूसार शहरात गेल्या दोन दिवसांपासून खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यात मोठे खड्डे पेव्हर ब्लॉक टाकून दुरूस्त करण्यात येत आहे. दरम्यान आयुक्त रमेश पवार यांनी पंचवटी विभागातील पेठ रोड, नाशिक पूर्व विभागातील श्री श्री रविशंकर मार्ग , नविन नाशिक विभागातील त्रिमूर्ती चौक ते पवन नगर रस्ता आणि इतर भागातील रस्त्यांची पाहणी केली. यावेळी खड्डे बुजवण्याच्या कामाबाबत त्यांनी सूचना केल्या आहेत. शहरातील सुमारे सहा हजार पैकी 3600 खड्डे महापालिकेने आत्तापर्यंत भरले आहेत. सुमारे 2400 खड्डे भरणे बाकी असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यावेळी शहर अभियंता शिवकुमार वंजारी आणि बांधकाम विभागाचे इतर वरिष्ठ अभियंता उपस्थित होते.

शहराच्या सहाही विभागात सतर्क राहून बांधकाम विभागाकडून त्वरित खड्डे बुजवले जात आहेत. रस्ते कामाचे मक्तेदार यांनाही कडक ताकीद देण्यात आली आहे. : रमेश पवार, आयुक्त महापालिका