घरमहाराष्ट्रनाशिकगुटखाबंदी, पानटपर्‍या बंद, तरीही पिचकार्‍या मारणारे अबाधित !

गुटखाबंदी, पानटपर्‍या बंद, तरीही पिचकार्‍या मारणारे अबाधित !

Subscribe

महापालिकेने थुंकणार्‍या ३८ जणांकडून आकारला प्रत्येकी हजारांचा दंड; थुंकणार्‍यांमध्ये ‘गुटखाबहाद्दरां’ची संख्या लक्षणीय

राज्यात सर्वत्र गुटखाबंदी असल्यामुळे तो पानटपर्‍यांवर विकणे हाच गुन्हा ठरतो. परंतु पोलिसांच्या नाकावर टिच्चून सर्वत्र गुटख्याची विक्री होतानाच दिसते. महत्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर पानटपर्‍या बंद करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार वरकरणी सगळ्याच टपर्‍या बंद दिसतात. असे असतानाही गुटखा खाऊन थुंकणारे महापालिकेच्या कर्मचार्‍यांना आढळून येत असल्याने बंद टपर्‍यांआडून गुटखाविक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेने थुंकणार्‍यांवर दंड वसुल करतानाच संबंधितांनी गुटखा कोठून खरेदी केला याचीही चौकशी केली तर गुटखा विक्रीचे केंद्रही कायमस्वरुपी बंद करणे शक्य होईल, अशीही मागणी करण्यात येत आहे.
करोनाने जगभर हैदोस घातलेला असताना अजूनही नाशिकमधील काही महाभागांच्या डोक्यात प्रकाश पडताना दिसत नाही. कोणत्याही संसर्गाची पर्वा न करता ही मंडळी पचापच थुंकतांना दिसत आहे. यात बहुसंख्य मंडळी गुटखा खाऊनच थुंकत असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या चार दिवसात महापालिकेने ३८ नागरिकांकडून प्रत्येकी हजार रुपये दंड वसुल केला आहे. त्यातील किमान २० नागरिक गुटखा खाऊन थुंकल्याचेही कर्मचार्‍यांनी सांगितले.
करोना विषाणूचा संसर्ग खोकल्याव्दारे आणि शिंकण्याव्दारे अधिक पसरु शकतो हे आजवर वारंवार सांगण्यात आले आहे. थुंकण्याने संसर्गाची भीती सर्वाधिक वाढू शकते हे देखील आरोग्य यंत्रणेने उर बडावून सांगितले आहे. असे असतानाही काही गुटखे खाणार्‍यांकडून रस्त्यावर पिचकार्‍या मारण्याचे ‘कर्म’ अव्याहत सुरुच असल्याचे दिसते. यापूर्वी रस्त्यावर थुंकणार्‍यांना केवळ १०० रुपये दंड होता. करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर या दंडाचे स्वरुप तब्बल दहा पटाने वाढवून ते हजार रुपये करण्यात आले आहे. पण तरीही थुंकणार्‍यांचे ‘उद्योग’ थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. करोनाच्या भीतीने उच्च बिंदू गाठलेला असतानाही सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍या बारा नागरिकांना महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी पकडून त्यांच्याकडून प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल केला. गेल्या चार दिवसांपासून ३८ नागरिकांकडून महापालिकेने ३८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

गुटखाबंदी, पानटपर्‍या बंद, तरीही पिचकार्‍या मारणारे अबाधित !
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -