मल्टीट्रेड प्रशिक्षणाला अनुपस्थित राहणार्‍यांवर कारवाई

एसटी मध्यवर्ती प्रशिक्षण केंद्राचा फतवा; 16 सप्टेंबरपासून कार्यशाळा

राज्य परिवहन महामंडळाच्या यांत्रिकी कर्मचार्‍यांना वाहन देखभाल व दुरुस्तीचे बहुव्यावसायिक प्रशिक्षण (मल्टीटे्रड) देण्यात येत आहे. राज्यातील विभागीय तथा आगार कार्यशाळांमधील प्रत्येकी एक प्रमुख कारागिर आणि कार्यशाळा सहायक अधीक्षकांना दापोली येथील मध्यवर्ती कार्यशाळेत 16 ते 27 सप्टेंबर दरम्यान हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यास अनुपस्थित राहणार्‍यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचा फतवा एसटीच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेने काढला आहे.

दहा दिवसांच्या या प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या कारागिर आणि अधीक्षकांना त्या-त्या कार्यशाळा व्यवस्थापकांनी कार्यमुक्त करावे, त्याचबरोबर हे कर्मचारी प्रशिक्षण संस्थेत वेळेवर हजर व्हावेत, याची खबरदारी त्या-त्या विभाग नियंत्रकांनी घ्यावी, असेही कार्यशाळेच्या उपमहाव्यवस्थानकांनी सूचीत केले आहे. जर प्रशिक्षणाला दांडी मारली तर अशा कारागिरांचा अहवाल थेट एसटी महामंडळाच्या उपाध्यक्षांना आणि व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात येणार असल्याचा लखोटा मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेने विभागीय कार्यशाळांना पाठवून दिला आहे.

तीन प्रवर्गांचा समावेश

एसटी कार्यशाळांतील प्रमुख कारागिर, सहायक कारागिर आणि क संवर्गातील कारागीर गटातील तांत्रिक कर्मचार्‍यांना मोटार मॅकेनिकल, डिझेल मॅकेनिकल, विजतंत्री, टायर फिटर, इलेक्ट्रॉनिक्स, बॉडी फिटर, बेंच फिटर,टर्नर मशिनिस्ट, मिलराइट फिटर, पेंटर स्प्रे पेंटर,प्रशितन, वातानूकुलित यंत्रणा, अ‍ॅटो विजतंत्री, इलेक्ट्रोनिक्स, ब्लॅक स्मिथ, टिन स्मिथ, वेल्टर,अप होल्टर, कारपेंटर,रबर संयोजक, टायर फिटर, संगणक माहिती व माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रोनिक्स, ऑटो विजतंत्री हे सर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे.