म्हसरूळ परिसरातील कलानगर भागात राहणार्या जागा खरेदी विक्री व्यावसायिक मनीष उमरवाल यांच्या घरावर अज्ञात युवकांनी शुक्रवारी (दि.७) पहाटेच्या सुमारास गोळीबार करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. व्यावसायिकावर युवकांनी केलेला हल्ला हा जागा खरेदी विक्री करण्याच्या व्यवहारातून झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.
पंचवटी परिसरातील नागचौक आणि हिरावाडी भागात गेल्या काही दिवसांपूर्वी गोळीबारची घटना ताजी असतानाच म्हसरूळ परिसरात गोळीबारची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस कुठे तरी कमी पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त शहरातील गुंडगिरी व दहशत मोडीत काढण्यासाठी काय क्शन घेणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलानगर भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते तथा जागा खरेदी विक्री व्यावसायिक मनीष उमरवाल (रा. लेन नं. ५, कलानगर, रिलायन्स पंपा समोर, दिंडोरी रोड) यांच्या घरावर शुक्रवार (दि.७) रोजी पहाटे ४ ते ४.३० वाजेच्या दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी गोळीबार करत दगड फेकल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या गोळीबार घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच उमरवाल यांच्या घराबाहेर लावलेल्या वाहनाची तोडफोड करत नुकसान करण्यात आले होते. वाहन तोडफोड प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोडफोड प्रकरणी हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असताना उमरवाल यांच्या घरावर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.
म्हसरूळ पोलीस गुन्हे शोध पथक हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. लवकरच आरोपींना अटक केली जाईल.
अतुल डहाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, म्हसरूळ