थोरात कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातून पहिला टँकर रवाना!

पेट्रोलसाठी होणार वापर

संगमनेर : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील संपूर्ण सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पातून सरकारी कंपन्यांसाठी पहिला इथेनॉल टँकर मंगळवारी (दि.४) रवाना झाला आहे. टँकरचे पूजन करताना चेअरमन बाबा ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, संचालक रोहिदास पवार, मिनानाथ वर्पे, रमेश गुंजाळ, अनिल काळे, दादासाहेब कुटे, संभाजी वाकचौरे, विनोद हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, भारत देशमुख आदींसह सर्व विभागातील अधिकारी उपस्थित होते.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन केलेल्या 5500 मे.टन कारखाना व 30 मेगावॉट वीजनिर्मिती प्रकल्प हा संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे. नव्या कारखान्या बरोबर कारखान्याने 40 हजार लिटर क्षमतेच्या डिस्टीलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. तसेच इंडस्ट्रियल अल्कोहोल प्रकल्पही कार्यान्वीत असून या प्रकल्पातून सरकारी कंपनी भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड या 3 सरकारी कंपन्यांसाठी अल्कोहल इथेनॉल देण्याचा वार्षिक करार झाला आहे. यानुसार थोरात कारखाना या सरकारी कंपन्यांना 50 लाख लिटर इंडस्ट्रियल अल्कोहोल पुरवणार आहे.

नव्याने विस्तारित केलेल्या डिस्टीलरी प्रकल्पातून तयार होणार्या अल्कोहोल मध्ये 95 टक्के इथेनॉल व पाच टक्के पाणी असते इथेनॉल प्रकल्पात पाणी वेगळे केले जात असून शंभर टक्के शुद्ध अल्कोहल तयार होत असून ते शासकीय कंपन्यांना दिले जात असल्याने ते पेट्रोल करता वापरण्यात येणार आहे. थोरात कारखान्याने सरकारी कंपन्यांशी केलेल्या करारातून या कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती ने एक मानाचा तुरा कारखान्याच्या शिरपेचात रोवला आहे.

यावेळी बोलताना बाबा ओहोळ म्हणाले की, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने तालुक्याचे हदय म्हणून काम केले आह. नवीन विस्तारित कारखान्या बरोबर विस्तारित डिस्टीलरी व इथेनॉल प्रकल्पातून कार्यक्षमतेने उत्पादन केले जात आहे. अखेर कारखान्यातून 4 लाख 99 हजार मे.टन ऊसाचे गाळप झाले आहे. हे सर्वांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.