घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपाचशे कोटींच्या खरेदीची गुढी, बाजारपेठेत नवचैतन्य; 'इतके' घर, वाहने, सोने विक्री

पाचशे कोटींच्या खरेदीची गुढी, बाजारपेठेत नवचैतन्य; ‘इतके’ घर, वाहने, सोने विक्री

Subscribe

७०० घरे, ५०० दुचाकी, चारचाकी वाहनांचे बुकिंग; सराफ बाजारात ४ कोटींची उलाढाल

नाशिक : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बाजारपेठेत नवचैतन्य दिसून आले. अनेकांनी या मुहूर्ताचा योग साधत खरेदीला प्राधान्य दिल्याने बांधकाम व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स मार्केट, गृहोपयोगी वस्तू आणि दुचाकी व चारचाकी वाहनांच्या क्षेत्रात गुढी पाडव्याच्या औचित्याने कोट्यवधींच्या आर्थिक उलाढालीची नोंद झाली. घराघरांतील मांगल्याच्या गुढीसोबत पाडव्यानिमित्त झालेल्या खरेदीची गुढीही उंचच राहिली. व्यापारी, व्यावसायिक आणि वितरकांनी दिलेल्या विविध ऑफर्समुळेही खरेदीचा उत्साह दुणावल्याचे चित्र बाजारपेठेत दिसले.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या निर्बंधामुळे सण उत्सवांवरही निर्बंध आले होते. मात्र, यंदा कुठलेही निर्बंध नसल्याने बाजारपेठांमध्ये नवचैतन्य दिसून आले. बुधवारी (दि.२२) सकाळपासूनच घराघरांत गुढीच्या काठीला स्नान घालण्यापासून ते गुढी सजवण्यापर्यंत घरातील प्रत्येकजण उत्साहाने सहभागी झाला होता. गृहिणींनी अंगणात रांगोळी काढून गुढीच्या पूजनासाठी तयारी केली. बैठ्या घरापासून ते अपार्टमेंटपर्यंत गुढी उभारण्यात आली होती. तसेच, रेडिमेड गुढीचेही दर्शन अनेक ठिकाणी घडले. नव्या-जुन्याचा संगम साधत साजर्‍या केलेल्या गुढीपाडव्याच्या सणाने बदलत्या काळाची चाहूल दिली. दुपारी साडेबारानंतर गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.

- Advertisement -
सोन्याला लाभली झळाळी

पाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानले जाते. पाडव्याला सोन्याच्या दराने ६८ हजारांची उच्चांकी झेप घेतली असली तरी, ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह दिसून आला. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६० हजार ८०० तर, २२ कॅरेटला ५३ हजार ५९० रूपये इतका होता. चांदी प्रति किलो ७०,९०० रूपयांवर गेली. ग्राहकांनी अगोदरच ऑर्डर देऊन दागिने घडवले. पाडव्याच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सुमारे ४ कोटींची उलाढाल झाली.

मुहूर्तावर झाली गृहस्वप्नपूर्ती

नाशिकचा विकास झपाट्याने होत असून, कोरोनानंतर घरांच्या मागणीतही वाढ झाली आहे. १ बीएचके, २ बीएचके फ्लॅटला अधिक मागणी आहे. शहरात नववसाहतींचा विकास झपाट्याने होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये विविध विकासकामे दृष्टीपथात आहेत. झपाट्याने विकसित होणार्‍या शहरांत आपले हक्काचे घर असावे यासाठी अनेकांनी गृहखरेदीला प्राधान्य दिले आहे. नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच १ एप्रिलपासून रेडीरेकनरचे दर वाढण्याची शक्यता असल्याने अनेकांनी गृहखरेदीचे व्यवहार करण्यास प्राधान्य दिले. पाडव्याच्या मुहूर्तावर ६०० घरांचे बुकिंग झाल्याचे बिल्डर्सने सांगितले.

- Advertisement -
पाचशेहून अधिक वाहनांचे बुकिंग

गुढीपाडव्यानिमित्त ऑटोमोबाईल सेक्टरमध्येही उत्साह दिसून आला. दुचाकी, चारचाकी वाहने खरेदीला ग्राहकांनी प्राधान्य दिले. दुचाकी विक्रीच्या शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. सुमारे ५०० चारचाकी, दुचाकींची विक्री करण्यात आली.

इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सलाही मोठी मागणी

इलेक्ट्रॉनिक्स बाजारातदेखील एलईडी टीव्ही, फ्रीज, मोबाईल, वॉशिंग मशीनसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी चांगली गर्दी होती. गुढीपाडव्यानिमित्त बाजारात मोबाईल खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होती. अनेक दालनांमध्ये युवक-युवतींनी मोबाईल खरेदीसाठी गर्दी केली होती. मात्र, अनेक दालनांमध्ये अपेक्षित मोबाईल फोन शिल्लक नव्हते. त्यामुळे अनेक ग्राहकांनी मोबाईल घेणे पुढे ढकलले.

सोन्याचे भाव वाढले असले तरी ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही. सकाळपासून पेढीवर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. विशेष करून लग्नसराईसाठी आजच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य दिले गेले. शेअर बाजारात सध्या सुरू असलेली घसरण, अमेरिकेत दोन बँका बुडाल्या. त्यामुळे अनेकजण सोन्यात गुंतवणूक करत आहेत. : मयूर शहाणे, संचालक, मयूर अलंकार

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. केवळ नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातून नाशिकमध्ये ग्राहकांकडून घर खरेदी केली जात आहे. बाहेरील जिल्ह्यातून गुंतवणूक वाढली आहे. रुंग्टा ग्रुपच्या प्रोजेक्टमध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर १०० घरांचे बुकिंग करण्यात आले. सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. : अभिषेक बुवा, संचालक, रुंग्टा ग्रुप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -