अंबडमध्ये जबरी घरफोडी

तीन फ्लॅटमधून लाखोंचे दागिने लंपास

  नाशिक शहरातील तीन फ्लॅटमध्ये जबरी घरफोडी झाल्याचे उघडकीस आले असून, चोरट्यांनी तीन घरांमधून लाखो रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना कामटवाडा, अंबड येथे घडली. याप्रकरणी मनोज भावसार यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज भावसार यांच्या घरातून ९० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या, ३२ हजार रुपयांचा सोन्याचा राणी हार, १२ हजार रुपयांचे सोन्याचे झुमके, चांदीच्या तांब्या, वाट्या, दोन चमचे आणि ५ हजार रुपये असा एकूण १ लाख ४८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. रवींद्र दत्तात्रय पाटील यांच्या घरातून ३७ हजार रुपये, १२ हजार रुपयांचे मंगळसूत्र, १० हजार रुपयांच्या सोन्याच्या कानातील रिंग, १५ हजार रुपये लंपास केले. तिसर्‍या घरातून सोन्याच्या ५ अंगठ्या, चांदीचे पेले, २६ हजार रुपये लंपास केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.