दोन बछडे विहिरीत; रेस्क्यू ऑपरेशनने सुटका

चिराई येथे वनविभागाचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन

Leopard_Calf
बिहिरीतून सुखरुप काढण्यात आलेल्या बछड्यांना त्यांची आई घेऊन गेली.

बागलाण तालुक्यातील चिराई येथील शेतशिवारात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्या मादी आपल्या दहा दिवसांच्या चार बछड्यांसह रात्री निघाली असता, यातील दोन बछडे विहिरीचा अंदाज न आल्याने शेतातील विहिरीत पडले. रेस्क्यू टीमने सकाळी ११. ३० च्या सुमारास सुरू केलेल्या रेस्क्यू ऑपरेशन १. ३० ला संपले. विहिरीत उतरलेले वनमजूर कैलास पवार यांच्या मदतीने दोर व कॅरेटच्या साह्याने बछड्यांना सुरक्षित बाहेर काढले. वनविभागाला तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर यश आले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

भास्कर वेडू अहिरे यांची विहीर असून, सकाळी शेतात फेरफटक्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याचा डरकाळीचा आवाज आला. त्यांनी विहीरीत डोकावून पाहिले असता त्यांना बिबट्या बछडे बसल्याचे दिसले. त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी एन. ए. कांबळे, वनपाल पी. आर. बोरसे, रुपेश दुसाने, पंकज परदेशी, प्रशांत खैरनार, के. एम. अहिरे, ए. डी. हेमांडे, एम. डी. भदाणे, एस. पी. चौरे, जी. के. अहिरे, बी. जी. सोनवणे, एम. एन. मोरे, एस. बी. मरशिवणे यांच्यासह संजय अहिरे, साहेबराव वेडू, नामदेव अहिरे, दिनकर अर्जुन, महेंद्र युवराज आदी ग्रामस्थ हे घटनास्थळी वनमजूर कैलास पवार यांना विहिरीत उतरवले. पवार यांनी तातडीने दोरीने कॅरेट बांधून विहिरीत सोडले. त्यानंतर दहा दिवसांच्या बछड्यांना सुरक्षित बाहेर काढले. परिसरातच बिबट्या मादी ठाण मांडून होती. यावेळी वनविभागाने सहकार्य करणार्‍या टीमला सुरक्षा कवच तयार केले होते. यामुळे आपल्या बछड्यांच्या शोधात बिबट्या मादी पुन्हा येण्याची शक्यता असल्यामुळे पिंजरा विहीरीच्या बाजूला ठेवला आहे.

बछड्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवले असून त्यानंतर बिबट्या मादीसाठी ठेवलेल्या पिंजर्‍यात अडकल्यानंतर वन अधिवासात सोडणार असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. बछड्यांची पशुवैद्यकीय अधिकारी कपिल खंडाळे यांनी तपासणी केली असता ते तंदुरुस्त असल्याचे सांगितले.