घरताज्या घडामोडीपक्षीय भेदाभेद विसरून सर्व पक्षीय नेत्यांनी मारला मिसळवर ताव

पक्षीय भेदाभेद विसरून सर्व पक्षीय नेत्यांनी मारला मिसळवर ताव

Subscribe

पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नाही : वसंत गिते

नाशिक । राज्यात महाविकास आघाडी विरूध्द शिवसेना असा सामना रंगलेला असला तरी, नाशिक येथे आयोजित एका मिसळ पार्टीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या नेत्यांसोबत भाजप नेत्यांनी एकमेकांशी हितगुज साधत मिसळवर ताव मारला. निमित्त होतं भाजप नेते वसंत गिते यांनी नववर्षाच्या मुहूर्तावर मित्र परिवार आणि समर्थकांसाठी आयोजित केलेल्या मिसळ पार्टीचं. ‘मिसळ डिप्लोमसी’च्या निमित्ताने गिते दुसर्‍या पक्षात जाण्याची चाचपणी करत असल्याचं बोललं जातं असलं तरी , आपण भाजपमध्येच असून पक्षाचे काम करत राहू, पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नसतो असेही ते म्हणाले. परंतु पुढचे ‘मिशन महापालिका’ असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यात राजकीय बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आधी बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपात घरवापसी केली. त्यानंतर भाजपमधील एक गट नाराज असल्याची चर्चा होती. त्यातच आता भाजप नेते आणि माजी आमदार वसंत गिते यांनी समर्थकांसाठी ‘मिसळ पार्टी’चं आयोजन केलं आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या मिसळ पार्टीकडे लागून होते. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी या मिसळ पार्टीला हजेरी लावत एकमेकांशी संवाद साधला.

- Advertisement -

काय म्हणाले गिते
गेली ४० वर्ष मी राजकारणात सक्रीय आहे. त्यामुळे सुख, दुःखात साथ देणार्‍या सहकार्‍यांशी, मित्र परिवाराशी हितगुज व्हावे, विचारांची देवाण घेवाण व्हावी या उददेशाने या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या मागे कोणताही राजकिय हेतू नाही. आज येथे सर्व पक्षीय पदाधिकारी, मित्र उपस्थित आहे. पक्षापेक्षा व्यक्ती मोठा नसतो. यानिमित्ताने शहर विकासाची चर्चा व्हावी या उददेशाने हे आयोजन करण्यात आले आल्याचे ते म्हणाले. पक्षांतराच्या चर्चेवर बोलतांना ते म्हणाले, चर्चा आहेत पण मुलगा नगरसेवक आहेत, सहकारी नगरसेवक आहेत मी देखील भाजपचे काम करत असल्याचे ते म्हणाले.

यांची होती उपस्थिती
महापौर सतिश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती गणेश गिते, शिवेसेना नेते बबनराव घोलप, काँग्रेसच शहराध्यक्ष शरद आहेर, माजी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, विनायक पांडे, भाजपनेते बाळासाहेब सानप, लक्ष्मण सावजी, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, प्रशांत जाधव, शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, दत्ता गायकवाड, शिवाजी गांगुर्डे, सत्यभामा गाडेकर, सुजाता डेरे आदि उपस्थित होते.

- Advertisement -

मनसे पदाधिकार्‍यांचीही उपस्थिती
दरम्यान, भाजपवासी वसंत गितेंच्या मिसळ पार्टीला हजेरी लावू नये, असे आदेश मनसे प्रदेश उपाध्यक्षांनी काढले आहेत. गितेंच्या पार्टीला उपस्थित राहील्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. असे असतांनाही खुदद जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर आणि मनसे शहराध्यक्ष अंकुश पवार यांनी मिसळ पार्टीला हजेरी लावल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -