भाजपावासी झालेले माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांची मनसेत घरवापसी

नाशिक : एकीकडे मनसेतून इतर पक्षात जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच मनसेचेच पूर्वाश्रमीचे जिल्हाध्यक्ष व २०१७ महानगरपालिका निवडणुकीपासून भारतीय जनता पार्टी मध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी पुन्हा एकदा मनसेत घरवापसी केली आहे. राज ठाकरे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थ या ठिकाणी कोंबडे यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते भूषण शिरसाठ व संदीप जगझाप यांनी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.

२०१२ ते २०१७ या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक महानगरपालिकेत सत्ता होती. मात्र, २०१७ साल येता येता पक्षात झालेली पडझड तसेच दिलेल्या आश्वासनांची न झालेली पूर्तता यामुळे पक्षाचे शहरातील वातावरण फिरले. त्यामुळे 2017 साली झालेल्या महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी वेळी अनेक विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना तसेच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. माजी आमदार वसंत गीते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे त्याकाळातील खंदे समर्थक असलेले सुदाम कोंबडे हे देखील पक्षाला सोडचिठ्ठी देतील असे बोलले जात होते. मात्र, त्यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आणि याची बक्षीस ही म्हणून त्यांना जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. मात्र महानगरपालिका निवडणुकीवेळी बदललेलं राजकीय समीकरण लक्षात घेता कोंबडे यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. भाजपामध्ये प्रवेश करूनही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांचा महानगरपालिका निवडणुकीत पराजय झाला त्यानंतर कोंबडे मागील पाच वर्षापासून राजकीय दृष्ट्या कुठल्याही प्रकारे सक्रिय नव्हते मात्र आता पुन्हा एकदा त्यांनी मनसेत प्रवेश करत राजकारणात कमबॅक केल्याची चर्चा आहे.

राज ठाकरे यांचे मुंबई येथील निवासस्थान शिवतीर्थ या ठिकाणी माजी नगरसेवक सुदाम कोंबडे यांच्यासह भूषण शिरसाट व संदीप जगझाप यांचा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक प्रदेश उपाध्यक्ष पराग शिंत्रे रतनकुमार इचम जिल्हाध्यक्ष अंकुश पवार माजी नगरसेवक सलीम शेख योगेश शेवरे दिलीप दातीर अनंत सांगळे संजय देवरे मनोज घोडके अमित गांगुर्डे जावेद शेख श्याम गोहाड विभागाध्यक्ष सत्यम खंडाळे योगेश लबडे भाऊसाहेब निमसे नितीन माळी संतोष कोरडे सचिन सिन्हा कौशल पाटील मनोज गोवर्धने गणेश मंडलिक संदेश जगताप आदींसह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते