नामको बँकेचे माजी संचालक भास्करराव कोठावदे अनंतात विलीन


नाशिक : लाडशाखीय वाणी समाजाचे माजी अध्यक्ष, नाशिक मर्चंट बँकेचे माजी संचालक भास्कर कृष्णाजी कोठावदे (वय ७३) यांचे गंगापूर रोडवरील राहत्या घरी अल्पशः आजाराने निधन झाले. कोठवदे यांनी नाशिकच्या सहकार क्षेत्रात अनेक वर्षांपासून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या जाण्याने शहराच्या सहकार क्षेत्राचे न भरून निघणारे नुकसान झाले असून लाडशाखिय वाणी समाजाचे एक जेष्ठ छत्र हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक तथा सुवर्णा नागरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अशा विविध पदांवर ते कार्यरत होते. मंगळवारी (दि.२४ मे) रात्री ८ वाजता पंचवटी अमरधाम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.