अपघातात चौघा मित्रांवर काळाचा घाला

नाशिक : मारुती कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात 4 मित्रांचा जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची घटना मनमाड जवळ पुणे-इंदौर मार्गावर घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. पाचही मित्र कार्यक्रमासाठी येवल्याकडे गेले होते, मात्र परत येताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन इतकी जोरात आदळली की यात चौघा मित्रांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात पाच मित्रांपैकी तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अजय वानखेडे हा गंभीर जखमी असून त्याला मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली. अपघातामुळे पुणे-इंदौर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.