Tuesday, March 25, 2025
27 C
Mumbai
Homeताज्या घडामोडीशहरात इंजिनीअर तरुणासह चौघांची आत्महत्या

शहरात इंजिनीअर तरुणासह चौघांची आत्महत्या

Subscribe

आत्महत्येमागचे कारण अस्पष्ट, पोलिसांकडून तपास सुरु

नाशिक शहरात आत्महत्यांच्या घटनांचे सत्र सुरुच असून, वेगवेगळ्या भागात राहणार्‍या चार जणांनी गळफास घेऊन जीवन संपविल्याचे सोमवारी (दि.१९) उघड झाले. यात एका इंजिनीअर तरुणाचा समावेश असून, अन्य घटनांमध्ये एक महिला आणि दोन कामगारांनी जीवन संपविले आहे. आत्महत्येमागचे कारण स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूच्या नोंदीन्वये तपास सुरु केला आहे.

इंजिनीअरने बेडरूममध्ये घेतला गळफास

गंगापूर रोड येथील ध्रुवनगरातील दत्त मंदिरासमोर राहणार्‍या सुमीत दत्तात्रेय निरगुड (वय ३०, साई रो हाऊस) या अभियांत्रिकीचे शिक्षण झालेल्या तरुणाने रविवारी (दि. १८) दुपारी १२ वाजता राहत्या घरात दुसर्‍या मजल्यावरील बेडरुममध्ये गळफास घेतला. सध्या तो बेरोजगार होता, अशी माहिती गंगापूर पोलिसांनी दिली. घटनेची माहिती मिळताच सहायक निरीक्षक नितीन पवार, हवालदार आर. के. चौधरी दाखल झाले. त्याच्या मृत्यूचे कारण समोर आले नाही.

कंपनीतून कमी केल्याने कामगाराची आत्महत्या

कंपनीतून कमी केल्याने बेरोजगारीचा सामना करणार्‍या २१ वर्षीय कामगाराने राहत्या घरात गळफास घेतला. अनोज सुरेश मौर्या(रा. रुक्मिणी अपार्टमेंट, आहिल्याबाई होळकर चौक, शिवाजीनगर, सातपूर) असे मृत कामगाराचे नाव आहे. अनोज याने रविवारी (दि. १८) रात्री आठ वाजेपूर्वी गळफास घेतला. त्याला काही महिन्यांपासून एका कंपनीने कामावर असताना ‘ब्रेक’ दिला होता. त्यामुळे तो विवंचनेत असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती कळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पाटील व हवालदार डी. डी. सरनाईक दाखल झाले. घटनास्थळी सुसाईड नोट वा अन्य वस्तू आढळली नाही. पुढील तपास सरनाईक करत आहेत.

देवळाली कँॅम्पमध्ये विवाहितेने संपवली जीवनयात्रा

देवळाली कँम्पमधील शेवगेदारणा रोडवरील गोडसे चाळीत (दि. १८) सकाळी एका गृहिणीने घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना घडली. सुनीता सुनिल ठाकरे(वय २७) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे पती मजुरी करतात तर ती घरकाम करत होती. या दाम्पत्यास दोन अपत्य असून, तिच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पुढील तपास देवळाली कँम्प पोलीस ठाण्याचे हवालदार सुखदेव गिर्‍हे करत आहेत.

अंबडमध्ये तरुणाची आत्महत्या

२३ वर्षीय विवाहित तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविले. उमेश किशोर गायकवाड(रा. औदुंबर स्टॉप, गणेश चौक, अंबड) असे मृताचे नाव आहे. उमेश याने(दि. १८) सायंकाळी साडेपाच वाजता अज्ञात कारणातून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पत्नी संध्या व भाऊ किशोर यांनी त्यास रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पंकज शिरवले करत आहेत.