नाशिक शहरात दिवसाला चार महिला बेपत्ता;राज्यातला बेपत्ता महिलांचा आकडा २५ हजार

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांचा आरोप

chitra wagh

नाशिक : राज्यात मुली, महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी २५ हजार महिला वर्षभरात गायब झाल्याची कबुली दिली आहे. नाशिकमध्ये दिवसाला चार महिला गायब होत आहेत. सरकार नावाची कुठलीचं व्यवस्था नसल्याचा हा परिणाम आहे, असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिर्घायुष्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे महामृत्युंजय जपयज्ञाचे आयोजन करण्यात आले होते, यानंतर त्या नाशिक येथे भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी चित्रा वाघ यांनी राज्यातील एकूणच कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले. राज्यात अपहरणाच्या घटना वाढत आहेत. महिला, मुली असुरक्षित आहेत. कायदे चांगले मात्र अंमलबजावणी करणारे सरकार कमजोर आहे. लोकांना पोलिसांचा आधार वाटतं नाही. गुंडांचा धाक वाटतो. कायदा व सुव्यव्यस्थेचे धिंडवडे निघाले.

सरकारची ही निष्क्रियता आहे. आमचे काही होत नाही ही मानसिकता वाढतं चालली आहे. यातून महिलांची छेड काढण्याची विकृती वाढतं असल्याचा आरोप त्यांनी केला. केवळ महिला, मुलीच गायब होत नाही तर आधी पोलीस आयुक्त गायब झाले. नंतर गृहमंत्री आणि आता तर मुख्यमंत्रीही गायब झाल्याचा टोलाही त्यांनी लगावला. नाशकात दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पण पोलिसांचा वचक राहिला नसल्याचे सांगत सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का, अशी शंका याची अशी परिस्थती असल्याचे त्या म्हणाल्या.

योजनांपासून आदिवासी बांधव वंचित

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरशेत येथे महिलांना पाण्यासाठी बल्लीवरून चालत जावे लागत असल्याचे समोर येताच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तात्काळ दखल घेतली याबद्दल त्यांनी ठाकरे यांचे अभिनंदन करत आभारही मानले. समस्या तात्पुरती सुटली असली, तरी आमदार, खासदारांनी याची दखल घेतली नाही याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. आदिवासी बांधवांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधत सावरगाव, शेंद्रीपाडा येथे रस्ता नाही, पाणी नाही. अनेक समस्या आदिवासी पाड्यांवर आहे.

अंगणवाडी, आरोग्य, रस्ते, पाणी प्रश्न आदी प्रश्नांकडे लक्ष वेधत या समस्या दररोज शासनाकडे मांडणार असल्याचे वाघ म्हणाल्या. खावटी योजनेद्वारे ११ लाख कुटुंबांना लाभ देणे गरजेचे असताना अद्यापही पन्नास टक्के लाभार्थी योजनेपासून वंचित आहेत. नाशिक जिल्ह्यातील सतरा हजार लाभार्थ्यांची यादी प्रलंबित आहे. आधारकार्ड नसल्याचे कारण दिले जाते. नंदूरबार जिल्ह्यातील मंत्री असून तेथे विविध समस्या आहेत. राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ दिला जात नाही. नंदूरबार जिल्ह्यात ३१ गरोधर मातांचा बळी गेला. आदिवासींपर्यंत निधी पोहोचतं नसल्याचा आरोप वाघ यांनी केला.