भारतीय संस्कृती शिकण्यासाठी आलेल्या आफ्रिकी विद्यार्थ्यांना २.७५ लाखांचा गंडा

नाशिक : भारतीय संस्कृतीबद्दल शिक्षण घेण्यासाठी दक्षिण अफ्रिकेतून नाशिकला आलेल्या विद्यार्थ्यांना एका एजंने पावणेतीन लाखांना गंडा घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार धक्कादायक उघडकीस आला आहे. या एजटंने आठ विद्यार्थ्यांकडून डिपॉझिटचे पैसे घेत ते घरमालकास न देता पैशांचा परस्पर अपहार केला.

याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गणेश पांडुरंग पाटील (२५, रा. खुटवड नगर) व निखील प्रकाश मुदिराज (३७, रा. गोविंद नगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी निखील मुदिराज यास अटक केली आहे. संशयित दोघांचे शिंगाडा तलाव येथील श्री. जी. युनिपार्कमध्ये कार्यालय असून, ते प्रॉपर्टी व्यवहारातील दलाल आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अफ्रिकेतील सेंडीन टॉन येथील रहिवाशी मोसेस टोटलीसंग बाबालोला (वय २१) हा तरुण शिक्षणासाठी भारतात आला. तो सध्या गंगापूररोड भागातील आस्था रेसिडेन्सी येथे वास्तव्यास आहे. मोसेस याने सप्टेंबर महिन्यात गणेश पाटील व निखील मुदिराज यांच्यामार्फत गंगापूर रोडवरील सदनिका भाडेतत्वावर घेतली. या व्यवहारासाठी घरमालकास डिपॉजिट द्यावे लागेल असे सांगत संशयित पाटील व मुदिराज यांनी मोसेस याच्याकडून ६० हजार रुपये तर इतर विद्यार्थ्यांकडूनही तीन लाख ३७ हजार रुपये घेतले.

या विद्यार्थ्यांना सोमेश्वर, गंगापूर रोड परिसरात भाडेतत्वावर सदनिका घेऊन दिल्या. दरम्यान, पाटील व मुदिराज यांनी विद्यार्थ्यांकडून डिपॉजिटपोटी घेतलेले लाखो रुपये घरमालकांना न देता स्वत:कडेच ठेवले. त्यानंतर घरमालकांनी विद्यार्थ्यांकडे डिपॉजिटची रक्कम मागितल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाटील व मुदिराज यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र दोघांनीही पैसे देण्यास टाळाटाळ केली. शिवाय, विद्यार्थ्यांचे कॉल घेणे बंद केले. सोमवारी (दि.२१) मोसेसयाने गणेश पाटील यास कॉल केला असता गणेशने त्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मोसेस याने मुंबईनाका पोलिसांकडे धाव घेत दोघांविरोधात फसवणूक, अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.