घरमहाराष्ट्रनाशिकआरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नावाने बोगस कोर्सेस

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नावाने बोगस कोर्सेस

Subscribe

प्रमाणपत्रावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा लोगो वापरुन विद्यापीठाची एकप्रकारे फसवणूक

नाशिक ; सेंट्रल कौन्सिल इंडियन मेडिसीनच्या मान्यतेविना आयुर्वेद व युनानी या वैद्यकीय शाखेत डिप्लोमा, फेलोशिप अभ्यासक्रम चालवले जातात. विनापरवानगी अभ्यासक्रमांच्या प्रमाणपत्रावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा लोगो वापरुन विद्यापीठाची एकप्रकारे फसवणूक केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

‘महाराष्ट्र मेडीकल प्रॅक्टिशनल अ‍ॅक्ट’ नुसार आयुर्वेदात एमडी व एमएस डॉक्टर काम करतात. त्यांना 2014 मध्ये सर्जरी व अ‍ॅलोपॅथिक उपचार करण्याची परवानगी मिळाली आहे. कायद्यातील या बदलाचा फायदा उठवत वैद्यकीय क्षेत्रातील काही संस्था आणि आयुर्वेद महाविद्यालयांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सहाय्याने फेलोशिप कोर्सेस सुरु केले. त्यासाठी साधारणत: 70 हजार रुपये शुल्क एका विद्यार्थ्याकडून घेतले जाते. प्रमाणपत्र मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीनची मान्यताच नसल्याने ते डॉक्टरच बोगस ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे दिसून येते. पर्यायाने हे डॉक्टर ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवतात. त्यांच्याकडून झालेल्या चुकांसाठी संपूर्ण आयुर्वेद डॉक्टरांना दोषी ठरवले जाते. त्यामुळे आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हे अभ्यासक्रम त्वरित बंद करण्याची मागणी होत आहे. नवनियुक्त कुलगुरु डॉ.कानिटकर याविषयी काय भूमिका घेतात याकडे आयुर्वेद विभागाचे लक्ष लागू आहे.

डिप्लोमा व फेलोशिप अभ्यासक्रमास ‘सीसीआयएम’ची मान्यताच नाही. त्यामुळे संपूर्ण आयुर्वेद डॉक्टर बदनाम होतात. विद्यापीठाने फसवणूक थांबवली पाहिजे.
                 – डॉ.संदीप कोतवाल, राज्य संघटक, ‘अस्तित्व’परिषद

 

 

या प्रकरणी विद्यापीठातर्फे चौकशी करण्यात येईल. हा प्रकार नवीनच असल्याने त्याबाबत आत्ताच बोलणे योग्य ठरणार नाही. फसवणूक होत असेल तर त्याला पायबंद घातला जाईल.
                            – डॉ.माधुरी कानिटकर, कुलगुरु, एमयूएचएस

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -