नाशिक : राणेनगर, स्टेट बँक चौक, लेखानगर भागात उड्डाणपूलावरून खाली उतरणाऱ्या अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीने प्रशासनासह परीसरातील नागरिक हैराण झाले असून, जड वाहनांचा मुक्तसंचार वाढल्याने किरकोळ अपघातांमध्येही वाढ झाली आहे. या वाहनांमुळे शहरातील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी वाढली असून, ती दूर करण्यासाठी वाहतूक नियमनासह दंडात्मक कारवाई करावी. अशी मागणी शिवसेना (उबाठा) च्या वतीने करण्यात आली आहे.या प्रकाराची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, महामार्गावरील उड्डाणपुलावरून होणारी अवजड वाहनांची वाहतुक एक्सीस बँक राणेनगर व स्प्लेंडर हॉल या ठिकाणी रोज उतरवली जाते. त्यामुळे ” राणेनगर भुयारी मार्ग” हा वाहतुकीच्या वर्दळीमुळे तसेच चाकरमान्यांच्या वर्दळीमुळे जाम होत असतो. याठिकाणी दररोज वाहूतकीचा खोळंबा होऊन, छोटे मोठे अपघात रोजच घडत असतात. यातून होणारे वाद-विवाद व भांडणांमुळे लगतच्या परिसरातील नागरिकांना वप्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. शहराच्या या कॉलनी परिसरात मुख्य रस्त्या लगत अनेक शाळा,महाविद्यालये आहेत. या भागातून ‘डिझेलची वाहतूक करणारे टँकर, नाशिकरोड मार्केट यार्डला जाणारे मालवाहतूक ट्रक, ट्रेलर, लोखंड वाहतूक करणारे ट्रेलर, राख वाहतूक बल्कर, बांधकाम साइटच्या अनुषंगाने आवश्यक असणारे कॉम्पॅक्टर, मिक्सर, अशी वेगवेगळी मालवाहतूक करणारी जड वाहने दिवसा या भागातून जातात.
अवजड वाहनांना अनेक शहरांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी वेगवेगळे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. ज्या अत्यावश्यक वाहनांना शहरात प्रवेश करणे आवश्यक आहे, अशा वाहनांना वाहतूक पोलिसांकडून स्वतंत्र परवानगी दिली जाते. यासाठी वाहतूक उपायुक्तांना विशेष अधिकार असतात. जड वाहनांचा हा मुक्तसंचार रोखण्यासाठी सुरुवातीला ८ दिवसा करिता पर्यायी चाचणी व्यवस्था म्हणून हि जड वाहने सकाळी ७ ते रात्री १० या दरम्यान खाली उतरण्यास मनाई करावी तसेच रात्री १० ते सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांना प्रवेश द्यावा. हिच व्यवस्था पुढे कायम करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उबाठाचे विष्णू पवार, राहुल सोनवणे, राजू कदम, शोभा दोंदे, संतोष सैले, निलेश साळुंखे, सुयश पाटील, ऋषी वर्मा, विनोद दळवी, रवि अधापूर, महेश पहान, बालम सैय्यद आदी उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -