मालवाहतूक वाहनांना परवानगी

वाहन चालकांना दिलासा; माल वाहतूकीचे वाहनं आता धावणार सुसाट

केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन निर्देशांनुसार महाराष्ट्र शासनाने सोमवार दि. २० एप्रिल पासून लॉकडाऊनबाबत नविन नियमावली लागू करण्यात आली आहे, त्यानुसार मालवाहतूक करणार्‍या सर्व वाहनांना यापुढे मालाची ने आण करण्याकरिता मान्यता देण्यात आली आहे, त्यामुळे मालवाहतूक करणार्‍या वाहनांना यापुढे नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी प्राप्त करण्याची गरज नाही असे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी स्पष्ट केले.

करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता केंद्र सरकारच्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने २४ मार्चपासून संपुर्ण राज्यात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी वाहनांना अत्यावश्यक मालाची वाहतुक करण्यासाठी शासन आदेशानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत विशेष पास जारी करण्यात येत होते. आतापर्यंत कार्यालयामार्फत अत्यावश्यक सेवेची मालवाहतुक करणार्‍या ४ हजार ३६३ वाहनांना आजपर्यंत ईपासेस देण्यात आले आहेत . परंतु , सोमवारपासून लॉकडाऊनबाबत नविन नियमावली जारी केलेली आहे. त्यानुसार मालवाहतुक करणार्‍या सर्व वाहनांना यापुढे मालाची ने आण करण्याकरिता परवानगी दिलेली आहे . त्यामुळे मालवाहतूक करणार्‍या वाहनांना यापुढे नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाची परवानगी प्राप्त करण्याची गरज नाही.

ई पास सुविधा

काही मालवाहतुक करणार्‍यांना आवश्यकता भासल्यास त्यांनी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज दाखल केल्यास त्यांना ऑनलाईन ईपास ची सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती नाशिकचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी दिली. याकरीता https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळालर ऑनलाईन अर्ज दाखल केल्यास, अर्जदारांना ऑनलाईन ई पास देण्यात येत आहेत. त्यामुळे अर्जदारांनी या कार्यालयाच्या ई मेल आयडीवर पाससाठी अर्ज करणे टाळावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.