घरमहाराष्ट्रनाशिकवृक्षतोडीचा तपास झाडेंकडे; आग विझवण्याची जबाबदारी आगलावेंकडे!

वृक्षतोडीचा तपास झाडेंकडे; आग विझवण्याची जबाबदारी आगलावेंकडे!

Subscribe

कामाशी मिळतेजुळते किंवा कामाच्या अगदीच विरोधाभास असणारी आडनावे

नावात काय असते असे म्हटले जाते. पण नावातच नव्हे तर आडनावातही बरेच काही असते हे नाशिकमधील काही कर्मचारी आणि अधिकार्‍यांच्या आडनावांतून स्पष्ट होते. गंगापूर रोडवरील वृक्षतोडी संदर्भातील गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार तानाजी झाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याचे आडनाव आगलावे आहे. आडनाव आणि कामाच्या स्वरुपातील विरोधाभासामुळे संबंधित नेहमीच चर्चेत असतात.

कामाशी मिळते जुळते असलेले किंवा कामाच्या अगदीच विरोधाभास असणारी आडनावे नाशकात बघायला मिळतात. महापालिकेच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या फायरमनचे नाव आहे संतोष आगलावे. अतिशय कर्तव्यनिष्ठ असलेला हा कर्मचारी आडनावाप्रमाणे अजिबातच नाही. त्यांनी आजवर ७० ते ८० ठिकाणी लागलेल्या आगी विझवण्याचे काम केलेले आहे. आग विझवण्यात त्यांचा हातखंडा आहे. हिरावाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या एका वैद्यकीय अधिकार्‍याचे नाव डॉ. शैलेश खुने आहे. आडनाव खुने असले तरी डॉक्टर महोदय लोकांचा जीव वाचवण्यात प्रसिद्ध आहेत. तर वाघांसह अन्य प्राणी वाचवण्याची जबाबदारी ज्या विभागाच्या खांद्यावर असते त्या वनविभागातील अधिकार्‍याचे नाव हे वाघमारे आहे. केवळ विरोधाभास नव्हे तर अनेक आडनावे हे संबंधितांच्या कामांशी मिळतेजुळते आहेत. ज्यांचा नेहमीच इमारतींच्या बांधकामांशी संबंध येतो त्या नगररचना विभागात काही महिन्यांपूर्वी कार्यरत असलेले उपअभियंत्याचे नाव विनोद माडीवाले आहे. सुरक्षा विभागात काही वर्षांपूर्वी कार्यरत असलेल्या एका कर्मचार्‍याचे नाव चोरमारे होते. तसेच काही वर्षांपूर्वी उद्यान विभागात फुलमाळी, झाडे नावाचे कर्मचारी कार्यरत होते.

झाडांच्या फांद्या तोडल्याने गुन्हा दाखल

गंगापूर रोड येथे एकाने आपल्या बंगल्यातील झाडांच्या फांद्या विनापरवानगी तोडल्या. या प्रकरणाचा तपास गंगापूर पोलीस स्टेशनचे हवालदार तानाजी झाडे यांच्याकडे देण्यात आला आहे. पश्चिम विभागीय कार्यालयाच्या हद्दीतील आकाशवाणी टॉवरजवळील संगीता बंगल्यातील रामफळाच्या झाडाच्या फांद्या मालकाने महापालिकेच्या परवानगीविना छाटल्या. त्यामुळे उद्यान निरीक्षक किरण बोडके यांनी जागामालक पौर्णिमा सुरेशकुमार गुप्ता यांच्याविरुद्ध महाराष्ट्र राज्य नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ नुसार गंंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या वृक्षतोडीच्या प्रकाराचा पुढील तपास तानाजी झाडे करणार आहेत. आता नावातच झाडे असल्याने ते संबंधित झाडाला न्याय देणारच, असे मानले जात आहे. ‘वृक्षतोड आणि झाडे’ असा परस्परविरोधी अनोखा योग यानिमित्ताने जुळून आल्याने प्रकरण लक्षवेधी ठरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -