घरमहाराष्ट्रनाशिकव्हीआयपी मोबाईल नंबरच्या आमिषाने लुटणारी टोळी जेरबंद

व्हीआयपी मोबाईल नंबरच्या आमिषाने लुटणारी टोळी जेरबंद

Subscribe

नाशिक फसवणुकीचे केंद्र, देशभरात १ कोटी ६ लाखांना गंडा

शहरातील गुन्हेगारांच्या मदतीने मुंबईमधील गुन्हेगारांनी नाशिकमधील ग्राहकांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे बनावट बँकखाते उघडून एअरटेलचा व्हीआयपी नंबर विशिष्ट रकमेत देण्याचे आमिष देशभरातील हजारो लोकांना दाखविले. १७ बनावट बँक खात्यांवर हैद्राबाद, मुंबई, रायपूर, मध्यप्रदेश, तमिळनाडू, दिल्ली, परळी, उत्तरप्रदेश येथील लोकांची १ कोटी ६ लाख ५३ हजार ८७२ रुपये जमा होताच ते ट्रान्सफर करत गुन्हेगारांनी फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून आणखी फसवणुकीचे गुन्हे उघडकीस येणार आहेत.

संशयित मुख्य आरोपी शरद पंडित पगार (रा.अशोकामार्ग, नाशिक), अंकुश सुभाष लोळगे (रा.भोसरी, पुणे), पंकज तुकाराम निकम (पाडळदे, ता.मालेगाव), नाजेश ईस्मत झवेरी (२५, रा.मीरा रोड, ठाणे,) जेन तसनीन खान (२३, रा.डोंबीवली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

हैद्राबाद येथील मित्रांचे व्हीआयपी क्रमांकाच्या आमिषाने ४ लाख ५० हजारांची फसवणूक झाल्याची तक्रार सिनेअभिनेता विंदु दार सिंग यांनी विश्वास नांगरे-पाटील यांच्याकडे केली. त्यांनी बँक खात्यावर भरणा करताच संबंधित व्यक्तीने मोबाईल बंद करत रक्कम खात्यातून काढून घेतल्याचे सांगितले. याप्रकरणी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हे शाखेने तपास करत मुंबई आणि नाशिकमधील एकूण पाच गुन्हेगारांना अटक केली आहे. आणखी दोनजणांच्या मागावर पोलीस असल्याचे विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितले. देशभरातील लोकांची रक्कम शहरातील विविध बँकांमध्ये बनावट १७ खात्यावर जमा झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस झाले.

गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंडी’ अशी…

गुन्हेगार जस्ट डायलमार्फत एअरटेल कंपनीचे व विविध कंपन्यांचे मोबाईल वापरत असलेल्या देशभरातील हजारो लोकांना व्हीआयपी क्रमांकाची आवश्यकता असल्यास संपर्क साधण्यासाठी बल्क मेसेज पाठवत. त्यापैकी काही लोक दिलेल्या मेसेजमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधत. त्यावेळी संशयित आरोपी व्हीआयपी मोबाईल नंबर देण्याचे आमिष दाखवत. त्या बदल्यात वेगवेगळ्या रकमा बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केलेल्या विविध बँकांच्या खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगत. रक्कम जमा होताच आरोपी मोबाईल बंद करत. ती रक्कम बँक खात्यातून काढून आपापसात वाटून घेत. अशाप्रकारणे सात जणांनी देशभरातील हजारो लोकांना लाखोंना गंडा घातला.

- Advertisement -

हायटेक साहित्य जप्त

पोलिसांनी आरोपी गुन्हा करण्यासाठी वापरलेले विविध बँका, संस्थांचे बनावट रबरी शिक्के, बनावट शाळा सोडल्याचे दाखले, आधारकार्ड, बनावट भाडे करारनामे, ग्राहकांशी संपर्कासाठी १३ मोबाईल, एक लॅपटॉप, बनावट रबरी स्टॅम्प तयार करण्याची मशीन जप्त केली.

आरोपींकडून फसवणूक

संशयित आरोपी शरद पंडित पगार (नाशिक) याने बँकेकडून कर्ज काढून देतो असे फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा, गंगापूर पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत. सुभाष लोळगेवर लासलगाव येथे दरोड्याचा गुन्हा, पंकज निकमवर दुचाकी चोरी, नाजेश झवेरीवर बिटकॉईन फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

नाशिकरोड तुरुंगात प्लॅन

मुख्य आरोपी शरद पगार व जेन तसनीन खान (२३, रा.डोंबिवली) या दोघांची नाशिकरोड तुरुंगात भेट झाली. दोघांनी हायटेक चोरी करण्यासाठी व्हीआयपी मोबाईल क्रमांकाच्या आमिषाने देशभरातील हजारो लोकांना लुटण्याचे ठरवले. तुरुंगातून बाहेर येताच साथीदारांच्या मदतीने नाशिकमध्ये १७ बनावट बँक खाते उघडली. त्यावर देशभरातील आमिष दाखवत लोकांकडून लाखो रुपये जमा करून घेत काढून घेतले. त्यानंतर आपापसातील टक्केवारीनुसार एकमेकांना वाटून घेतले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -