गळ्यात कांद्याच्या माळा, रस्त्यावर मांडली चूल, थापल्या भाकरी; आप’चे अनोखे आंदोलन

नाशिक : एलपीजी गॅस दरवाढ तसेच शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी आम आदमी पार्टीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी गळ्यात कांद्याच्या माळा, घालून रस्त्यावर चूल मांडून भाकरया थापत अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र तसेच राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भारत सरकारने वेळोवेळी सिलेंडरचे भाव हे ५० ते १०० रुपयाने दर चार ते पाच महिन्यांनी वाढवले आहेत. सतत होणारी ही दरवाढ ही गरीब वंचित शोषित लोकांच्या आर्थिक नुकसान करीत असल्याचे दिसत आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आम आदमी पार्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूक मांडून त्यावर भाकरी थापून आणि कांदे कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा फोडून जेवणाचे दृश्य मांडून आप कार्यकर्त्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. ज्या पद्धतीने उद्योगपती आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार ठेवतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. विद्यमान सरकारकडून शेतकऱ्यांवर सतत अन्याय होत आहे. शेतकरी हा अन्नदाता असून त्याने जर अन्न पिकवणे बंद केले तर देशात हाहाकार माजेल, त्याचीच सरकारने जर काळजी घेतली नाही तर तो पूर्ण कोलमडेल आणि देशातील अन्न व्यवस्था विस्कळीत होईल. अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सध्या देशात ही दोन अतिशय महत्वाचे प्रश्न निर्माण झाले असून याबाबतच्या विविध मागण्यांसाठी आम आदमी पार्टीने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अनोखे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. यावेळी आपचे योगेश कापसे, गिरीश उगले पाटील, अभिजीत गोसावी, अमर गांगुर्डे, प्रदीप लोखंडे, शेतांबरी आहेर, चंदन पवार, संदीप गोडसे, मेघराज भोसले,अनिल फोकणे, नविंदर अहलुवालिया, दिपक सरोदे, नंदू ठाकरे, संतोष राऊत, चंद्रशेखर महानुभव, दिलीप कोल्हे, सुमित शर्मा, विश्वजित सावंत, निर्मला दाणी, शकुंतला वाघ, स्वप्नील घिया, शांताबाई बनकर, मंगला पोरजे ,पुष्पा विष्णू आहेर सखुबाई धुळे, मोना लक्ष्मण जाधव ,मीना महाले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.