घरमहाराष्ट्रनाशिकडिझेल दाहिनीऐवजी आता गॅस दाहिनी

डिझेल दाहिनीऐवजी आता गॅस दाहिनी

Subscribe

महापालिका प्रशासनाने या दाहिनीऐवजी गुरुवार (दि.२५) पासून गॅस दाहिनी सुरू केली आहे.

पर्यावरण संवर्धनासाठी नाशिक अमरधाममध्ये उभारण्यात आलेल्या डिझेल दाहिनीला मोठा प्रतिसाद मिळत असल्याची बाब लक्षात घेत महापालिका प्रशासनाने या दाहिनीऐवजी गुरुवार (दि.२५) पासून गॅस दाहिनी सुरू केली आहे. त्यामुळे डिझेलमुळे होणार्‍या प्रदूषणापासून बचाव होईलच; शिवाय महापालिकेची आर्थिक बचतही होणार आहे.

हिंदू धर्मासह अन्य काही धर्मांत अंत्यविधीवेळी अग्निडाग देण्याची परंपरा आहे. लाकडाच्या चितेवर अशा प्रकारचा अग्निडाग दिला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर होतो. परिणामत: वृक्षतोडही तितक्याच मोठ्या प्रमाणात होते. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची होणारी हानी बघता नाशिक अमरधाममध्ये महापालिकेने २३ वर्षांपूर्वी डिझेल शवदाहिनी बसवली. प्रारंभी ठेकेदाराच्या वादामुळे ही दाहिनी सुरू करण्यात अडचणी आल्या. सुरू झाल्यानंतर तिच्यात शव जाळण्यास फारसे कोणी तयार होत नव्हते. २००५ ते २०१० या कालावधीत दाहिनी बंदच होती. २०१० मध्ये डिझेल शवदाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली. या तेवीस वर्षांच्या काळात जनजागृतीही वाढून डिझेल दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यास प्रतिसाद वाढला. दाहिनीचालकांच्या माहितीनुसार २३ वर्षांच्या काळात तब्बल २६ हजार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात बेवारस मृतदेहांचाही समावेश आहे.

- Advertisement -

विद्युत दाहिनीलाही जोरदार प्रतिसाद

पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराची संकल्पना प्रत्यक्षात साकरण्याचे पहिले पाऊल म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या विद्युत दाहिनीत सात महिन्यात सुमारे ३०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे तब्बल ८४ टन १६० किलो सरपण वाचले आहे.

व्यापक जनजागृती

अमरधाममध्ये अंत्यविधीसाठी येणार्‍या नागरिकांना कर्मचार्‍यांकडून दाहिनीचे महत्व पटवून देत जनजागृती करण्यात येत आहे. त्यास नाशिककर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. १३३ मृतदेहांवर कुटुंबियांच्या संमतीने विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. कुटुंबियांचा शोध न लागल्याने १३० मृतदेहांचे महापालिकेकडून विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेकजण पारंपारिक पद्धतीने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असल्याने वेळ, पैसा व नैसर्गिक संपत्तीचा र्‍हास होत आहे. सर्व नाशिककरांनी विद्युतदाहिनी वा गॅस दाहिनीचा वापर केला, तर दर दिवशी हजारो टन लाकडांची बचत होऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -