भूकंप अभ्यासासाठी भूवैज्ञानिकांच्या पथकाचा नाशिकमध्ये तळ, दोन वर्ष करणार अभ्यास

जिल्ह्यात भूगर्भ हालचालींचे होणार सर्वेक्षण; प्रमुख कारणांचा शोध

earthquake-1
प्रातिनिधीक फोटो

मनीष कटारीया

जिल्ह्यात अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कळवण तालुक्यातील दळवट गाव साधारण भूकंपाचे केंद्रबिंदू मानले जाते. भूकंपाच्या हादर्‍यांमुळे जिल्हावासियांना अनेकदा भयभीत केले आहे. यामुळे आता जिल्ह्याच्या भूकंपप्रवण क्षेत्रात भूगर्भात घडणार्‍या हालचाली अभ्यासण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिकांचे पथक दोन वर्षे नाशिक परिसरात तळ ठोकून भूगर्भातील हालचाली अभ्यासणार आहे. यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाला संभाव्य धोके टाळण्यासाठी वैज्ञानिकांच्या अहवालाद्वारे उपाययोजना करणे सोयीस्कर ठरणार आहे.

कळवण, देवळा, बागलाण, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवतात. गत पाच वर्षांत तब्बल दहावेळा भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांची तीव्रता साधारण १. ८ ते ३.२ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे. ती कमी असल्याने सुदैवाने येथे जीवितहानी अथवा वित्तहानी झालेली नाही. असे असले तरी सातत्याने जाणवणार्‍या धक्क्यांमुळे कायम भीतीचे वातावरण असते. भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण अर्थात जीएसआयच्या भूकंप मोेजणीच्या परिमाणानुसार नाशिक जिल्हा झोन तीनमध्ये गणला जातो. यामुळे याभागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत होती. यामुळे भूगर्भातील हालचालींचा अभ्यास केला जावा. तसेच संभाव्य धोके टाळण्यासाठी मदत व्हावी, या उददेशाने जिल्हा आपत्ती प्राधिकरणाने केंद्राच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाशी संपर्क साधून जिल्ह्यातील भूगर्भ हालचालींचा अभ्यास करण्याची मागणी केली होती. यानुसार या सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे. याकरता नागपूर येथील तीन शास्त्रज्ञांच्या पथकामार्फत अभ्यास सुरू केला आहे. या पथकामार्फत भूकंपप्रवण क्षेत्रात अभ्यास करत आहे. कॅम्प ऑफिस स्वरुपात या पथकाने काम सुरू केले असून दोन वर्ष हे पथक या भागातील भुगर्भाच्या हालचाली अभ्यासणार आहे. त्याचा अहवाल तयार करून भूकंपाचे निश्चित कारण समजून संभाव्य धोके टाळणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला शक्य होणार आहे.

झोन बदलण्याची शक्यता

या भागातील जमिनीखालील हालचालींच्या अभ्यासानंतर नेमके निष्कर्ष पुढे येणार आहेत. जीएसआच्या परिमाणानुसार नाशिक झोन तीनमध्ये असले तरी जिल्ह्याच्या वेगवेगळया भागात हा झोन बदलू शकतो. कदाचित काही भाग भूकंपाच्या झोन दोनमध्ये तर एखादा भाग झोन एकमध्येही सामाविष्ट होऊ शकतो.

भूकंपप्रवण असूनही धक्के नाही

दळवट, अंबानेर, अभोणा, कनाशी, उमराळे, पेठ, पांडाणे, माळेदुमाला, गोंदे, बाहेगाव येथे भुकंपाचे धक्के जाणवतात. चांदवड, येवला, ही भूकंपप्रवण क्षेत्रे असूनही तेथे भूकंपाचे धक्के जाणवलेले नाहीत.

सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल

जिल्ह्यात वारंवार होणार्‍या भूकंपामुळे याचा अभ्यास करण्यासाठी भूवैज्ञानिकांची मदत घेण्यात येत आहे. यात त्या तालुक्याची भौगोलिक परिस्थितीचे मॅपिंग करण्यात येणार आहे. तेथील जमीनीखालचा दगड, पाण्याचे स्त्रोत याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल. या अहवालावरून काही निष्कर्ष समोर येऊन याचा प्रशासनाला निश्चितच फायदा होणार आहे. – रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी