घरताज्या घडामोडीघोटी टोलनाक्यावरील आंदोलनाने ट्रॅफिक जॅम

घोटी टोलनाक्यावरील आंदोलनाने ट्रॅफिक जॅम

Subscribe

महामार्गांवरील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, यामुळे वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. या खड्ड्यांमुळे हैराण झालेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी मुंबईकडे जात असताना घोटी टोलनाक्यावर आंदोलन करत अर्धा तास टोलनाका बंद पाडला. यावेळी गोडसे यांनी खड्डे तातडीने बुजवले नाहीत तर ठेकेदार कारवाई करावी, अशी मागणी केली. मात्र, दरम्यान, केवळ तीनच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. या कोंडीत अडकलेल्या दोन रुग्णवाहिकांना खासदारांनी स्वत: रस्त्यावर उतरत लेन मोकळ्या करुन दिल्या.

खासदार हेमंत गोडसे बुधवारी पहाटे मंत्रालयात कामानिमित्त जात असताना नाशिक-मुंबई महामार्गावरील घोटी टोलनाक्यावर केवळ तीनच लेन सुरु असल्यामुळे व रस्त्याची झालेली चाळण यामुळे तब्बल अर्धा ते एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचे गोडसे यांच्या निदर्शनास आले.  याचवेळी दोन रुग्णवाहिकादेखील वाहतूक कोंडीत अडकल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वत: भरपावसात रस्त्यावर खाली उतरुन टोलनाक्याच्या सर्व लेन (मार्ग) मोकळ्या करत वाहनांना वाट मोकळी करुन दिली. यामुळे वाहनांसह दोन्हीही रुग्णवाहिकांचा मार्ग मोकळा झाल्याने रुग्णवाहिका मुंबईकडे रवाना झाल्या. टोलनाक्यावर आठ ते दहा लेन असताना केवळ तीनच लेन सुरु ठेवण्यात आल्याचे यावेळी निदर्शनास आले. याशिवाय रुग्णवाहिकांसाठी असलेल्या विशेष लेनमध्ये टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी स्वत:ची वाहने उभी केली होती. त्यामुळे नाशिक बाजुने मुंबईकडे रुग्ण घेवून जाणार्‍या दोन रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीमुळे रांगेत अडकून पडल्या होत्या. खासदार गोडसे यांनी टोलनाका प्रशासनाच्या या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

शासनाच्या नियमानुसार ७२ तासांत हे खड्डे बुजवणे अपेक्षित आहे. परंतु, ठेकेदार याकडे लक्ष न देता सक्तीने टोल वसूली करतात. सदर रस्त्याची तत्काळ दुरुस्तीचे कामे सुरु करणे गरजेचे आहे. अशाप्रकारे जाणीवपूर्वक वाहनांची वाट रोखणे चुकीचे आहे. तसेच, खड्डे न बुजवल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी.
– खासदार हेमंत गोडसे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -