आहुर्लीत वीज पडून मुलीचा मृत्यू

शहरासह जिल्हाभरात दमदार पावसाची हजेरी

Aarti_Gaykar

इगतपुरी : तालुक्यातील आहुर्ली येथे शेतात गायी चारणार्‍या अल्पवयीन मुलीचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.११) घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

आहुर्ली येथील आरती हिरामण गायकर (वय १६) ही मुलगी गावालगत शेतात गायी चारत होती. त्याचवेळी तिच्या अंगावर वीज कोसळली. घटनेची माहिती मिळताच आरतीला तातडीने घोटी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तपासणीअंती तिला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. दरम्यान, घोटी पोलिसांनी नैसर्गिक दुर्घटना म्हणून नोंद करत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार सुहास गोसावी करत आहेत. अत्यंत शांत व सुस्वभावी असणार्‍या आरतीने नुकतीच दहावीची परिक्षा दिली होती. त्यात ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. तिच्या पश्चात आई, वडिल, भाऊ व बहिण असा परिवार आहे.

दुपारनंतर पावसाची हजेरी

नाशिक शहरासह जिल्हाभरात विविध ठिकाणी शुक्रवारी दुपारनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. काही भागांत विजांच्या कडकडाटात पाऊस झाला. त्यामुळे सखल भागांत मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा झाला होता.