पाड्यांवरील मुलींची पायपीट थांबणार

‘मानव विकास मिशन’अंतर्गत चार हजार सायकली वाटप, आठ तालुक्यांत २१,७०२ विद्यार्थिनींना लाभ

Gift of Bicycle

वाड्या-वस्त्यांवर माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा नसल्याने दुर्गम आदिवासी भागात आजही पायपीट करून शिक्षण घ्यावे लागते. या पार्श्वभूमीवर मानव विकास मिशन अंतर्गत आदिवासी मुलींना सायकली वाटप करण्यात आल्याने आता त्यांची पायपीट थांबणार आहे. आदिवासी तालुक्यांतील 4 हजार 273 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले.

आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थीनींना आजही शिक्षणासाठी घरापासून तीन ते चार किलोमीटर दुरवरील शाळा-महाविद्यालयांमध्ये जावे लागते. अनेकदा वेळेवर बसेस तसेच दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थिनीना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. हीच बाब लक्षात घेत सरकारतर्फे आदिवासी विद्यार्थिनींना सायकल वाटप केले जाते. मानवविकास अभियानांतर्गत दरवर्षी सायकलचे वाटप केले जाते. घरापासून तीन ते चार किलोमीटरच्या परिसरात वास्तव्यास असलेल्या 8 ते 12 वीपर्यंत शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप केले जाते. त्यासाठी सरकारकडून 3500 रुपयांचे अनुदान विद्यार्थीनींच्या बँक खात्यात वर्ग केले जाते. मात्र, हे अनुदान देताना विद्यार्थिनींच्या बँक खात्यात प्रथम दोन हजार रुपये जमा केले जातात. तसेच सायकल घेतल्याची पावती शाळेमार्फत जमा केल्यानंतर उर्वरित दीड हजार रुपये विद्यार्थिनींना देण्यात येतात. जिल्ह्यात 2018-19 मध्ये आठ आदिवासी तालुक्यांमधील 229 शाळांमधील 4 हजार 273 विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यत आले. यासाठी सरकारने 1 कोटी 49 लाख 55 हजार 500 रुपयांचे अनुदान दिले. दरम्यान, सुरगाणा, इगतपुरी, दिंडोरी, बालगाण तालुक्यांत प्रत्येकी 471 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. नांदगावमध्ये 570, कळवणमध्ये 521, त्र्यंबकेश्वरमध्ये 476 तसेच पेठ तालुक्यातील 422 मुली लाभार्थी ठरल्या. सायकल हाताशी आल्याने यासर्व मुलींचा शाळा-महाविद्यालयापर्यंतचा प्रवास सुकर झाला आहे.

सन 2013-14 पासून ते 2018-19 पर्यंत सहा वर्षांत जिल्ह्यातील आठही आदिवासी तालुक्यांमधील 21 हजार 702 विद्यार्थिनींना प्रशासनातर्फे मानवविकास अभियानाअंतर्गत सायकलचा लाभ देण्यात आला. त्यावर सुमारे 6 कोटी 87 लाख 57 हजार 500 रुपयांचे अनुदान सरकारतर्फे जिल्हा मानवविकास विभागाकडे वर्ग करण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासनातर्फे हे सर्व अनुदान लाभार्थी विद्यार्थिनींच्या बँकखात्यात जमा करण्यात आले.