घरमहाराष्ट्रनाशिकमुलीसाठी वडीलांचा न्यायालयीन लढा, निकालाने मिळाला दिलासा

मुलीसाठी वडीलांचा न्यायालयीन लढा, निकालाने मिळाला दिलासा

Subscribe

विद्यार्थिनीला अखेर न्याय : न्यायालयाकडून महाविद्यालयाला आदेश

मुलीच्या भवितव्यासाठी सुरु असलेल्या वडिलांच्या न्यायालयीन लढ्याला अखेर यश आल्याची घटना पुढे आली आहे.  शहरातील एका महाविद्यालयाने चुकीच्या विषयाचा निकालात उल्लेख केल्याने संबंधित विद्यार्थिनीचे एक वर्षासाठी मोठे शैक्षणिक नुकसान होणार होते. अखेर पालकांनी कायदेशीर मार्गाने लढा देत संबंधित महाविद्यालयासह शिक्षण विभागाला न्याय मिळवून देण्यास भाग पाडले. न्यायालयाने या विद्यार्थिनीला सात दिवसांत सुधारित निकालपत्र देऊन नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपयेदेखील देण्याचा आदेश दिला.

ब्रह्मा व्हॅली महाविद्यालयात शिक्षण घेणारी स्नेहल भूषण देशमुख हिने १२ वीच्या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे इतर विषयांसोबत गणित विषयाचा अर्जही भरला होता. मात्र, महाविद्यालयाच्या चुकीमुळे संबंधित विद्यार्थिनीला चुकीचा निकाल देण्यात आला. जीवशास्त्र (बायोलॉजी) विषय घेतलेलाच नसताना त्याचा निकालपत्रात उल्लेख होता. पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी गणित विषय असल्याने चुकीच्या निकालपत्रामुळे विद्यार्थिनीसह तिच्या पालकांची चिंता वाढली. त्यांनी महाविद्यालयासह राज्य शिक्षण मंडळ आणि नाशिक शिक्षण विभागीय कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करून सुधारित निकालपत्र मिळावे म्हणून भेटी घेत प्राचार्य आणि विभागीय शिक्षण अधिकारी यांना विनवण्या केल्या. परंतू शिक्षण मंडळ महाविद्यालयाकडे तर महाविद्यालय शिक्षण मंडळाकडे बोट दाखवत दुर्लक्ष करत होते. अखेर पालकांनी मुलीचे एक वर्षाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी, तसेच संबंधित महाविद्यालय आणि शिक्षण विभागाला कायदेशीर मार्गाने लढा देण्याचे ठरवून मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात महाविद्यालय, राज्य शिक्षण मंडळ महाराष्ट्र आणि विभागीय शिक्षण मंडळ नाशिक यांच्या विरोधात याचिका दाखल केली.

- Advertisement -

या याचिकेवर ६ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती एस. जे. काथावाला आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी विद्यार्थिनीच्या बाजूने अ‍ॅड. अनिलकुमार पाटील यांनी युक्तिवाद करत ही महाविद्यालयाची चूक असल्याचे न्यायालयासमोर आणून दिले. तर ब्रह्मा व्हॅली संस्थेकडून अ‍ॅड. सुगंधा देशमुख यांनी कामकाज बघत विषय बदलाची चूक कॉलेजकडून झाल्याचे कबूल केले, त्यावर न्यायमूर्तींनी निकालपत्र मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत सुधारित निकालपत्र विद्यार्थिनीला देण्याचे सांगितलेले असून विद्यार्थिनीला नुकसान भरपाई म्हणून २५ हजार रुपये धनादेशाद्वारे सात दिवसांच्या आत देण्याचे आदेशात म्हटलेले आहे.

अशा घटना अनेक विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या असतील, त्यांनीदेखील आपले निकालपत्र दुरुस्त करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा. आज स्नेहल आणि तिच्या पालकांनी एका शिक्षण संस्थेच्या आणि व्यवस्थेच्या विरोधात न्यायालयीन लढा देत विजय मिळवत इतर विद्यार्थी आणि पालकांनाही दिशा दाखवली आहे. अनेकदा शिक्षण विभाग किंवा महाविद्यालयांच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षांचे नुकसान होते आणि त्या अपयशाच्या दबावाखाली विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, अशा स्थितीत पालकांनी मुलांसोबत सुसंवाद साधला तर नक्कीच मार्ग मिळतो, हे या घटनेवरून अधोरेखित होते.

मुलीच्या भविष्याचा विचार करत संबंधित शिक्षण संस्था आणि विभागीय शिक्षण मंडळ अधिकारी यांना भेटून विनवणी केली. पण कुठेही न्याय भेटत नसल्याने शेवटी न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. अनेक महिन्यांपासून या प्रकरणामुळे मानसिक आणि शारीरिक त्रासातून संपूर्ण कुटुंब गेले. कोणत्याही विद्यार्थ्यांवर तसेच पालकांवर ही वेळ येऊ नये.

– भूषण देशमुख, पालक

- Advertisement -

जो विषय मी भरलाच नाही, तो निकालपत्रात आल्याने आश्चर्य वाटले. मी कॉलेजला सांगितल्यावर त्यांनी शिक्षण मंडळाकडे अर्ज करून सुधारित निकाल मिळेल असे सांगून दिशाभूल केली. पुढील प्रवेशासाठी कमी कालावधी असल्याने प्रत्येक दिवस महत्वाचा होता. कॉलेज आणि शिक्षण विभाग काहीच हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्यावर वडिलांशी बोलून न्यायालयात जाण्याचे ठरवले. न्यायालयाने सत्य तपासून निकाल दिला त्यामुळे हा आनंद शब्दात न सांगता येण्यासारखा आहे.
                        – स्नेहल देशमुख, विद्यार्थिनी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -