‘धगधगते शंभूपर्व’तून गौरवशाली इतिहासाला उजाळा: प्रा. सचिन कानिटकर

 ‘धगधगते शंभूपर्व’ व्याख्यानमालेस प्रारंभ

shambhu parva (2)
सोहळ्याप्रसंगी बोलताना प्रा. सचिन कानिटकर

शिवरायांसारखा महामेरू शंभूराजे बालपणापासूनच अनुभवत होते. जाज्वल्य देशाभिमान, स्वाभिमान आणि करारी बाण्याचे बाळकडू शंभूराजांना पिता शिवरायांकडून मिळाले होते. त्यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वातील तेज प्रखर बनत गेले. या शब्दात ओघवत्या वाणीतून व्याख्याते प्रा. सचिन कानेटकर यांनी शंभूराजांचा इतिहास जागवला. शुक्रवार १८ जानेवारीला कालिदास कलामंदिरात आयोजित ‘धगधगते शंभूपर्व’ या व्याख्यानातून त्यांनी शिवपूत्र संभाजी राजांच्या जन्माआधीपासून ते बालपणापर्यंत आलेख मांडला. ही तीन दिवसीय व्याख्यानमाला रविवार २० जानेवारीपर्यंत चालणार आहे.
‘संस्कृती’ आणि ‘नाशिक महानगर पालिके’च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कानिटकर यांनी ‘धगधगते शंभूपर्व’ व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पास प्रारंभ केला. शिवजन्मापूर्वीचा इतिहास, भोसले-जाधव यांच्यातील संघर्ष, शंभू राजांच्या जन्मवेळीचा संघर्ष, आग्रा दरबारात शिवाजी राजांचा उग्रावतार, औरंगजेबाच्या कैदेतून सुटका या प्रत्येक प्रसंगात उमललेले शिवाजी आणि संभाजी यांच्यातील नातं कानिटकर यांनी आवेशपूर्ण शैलीतून उलगडले.
व्याख्यानाआधी ‘संस्कृती’संस्थेचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी स्वागत केले. यावेळी गडकोट संवर्धन कार्यात योगदान देणारे मनोज पिंगळे, मोहनराव चव्हाण, सुनील पैठणकर, राम खुर्दळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ. कैलास कमोद, माजी मंत्री शोभा बच्छाव, जिल्हा परिषद अध्यक्षा शितल सांगळे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, सतीश शुक्ल, अजय बोरस्ते, गजानन शेलार, गुरमित बग्गा, सलीम शेख, विलास शिंदे आदी उपस्थित होते.