घरमहाराष्ट्रनाशिककिकवीसह गोदावरी नदीजोड योजना लवकरच मार्गी लावणार

किकवीसह गोदावरी नदीजोड योजना लवकरच मार्गी लावणार

Subscribe

जलसंपदा मंत्री पाटील यांची ग्वाही, जिल्ह्यातील प्रकल्पांचा आढावा

नाशिक : जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजना लवकर मंजूर होण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेवून ही कामे तत्काळ मार्गी लावणार असल्याची ग्वाही जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. मंत्रालयातील दालनात नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागांतर्गत असलेल्या विविध प्रकल्प मंजुरीची बैठक पार पडली या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, लाभक्षेत्र विकास सचिव किरण कुलकर्णी, सहसचिव अतुल कपोते, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरूण नाईक, कार्यकारी अभियंता संगीता जगताप यावेळी या बैठकीला उपस्थित होत्या.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले की, उर्ध्व गोदावरी प्रकल्प प्रस्ताव, कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी, आंबोली वेळुंजे या प्रवाही योजना, किकवी पेयजल प्रकल्प व पार गोदावरी उपसा जोड योजनांच्या कामांच्या बाबतीत राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नियोजन विभाग अशा वेगवेगळ्या पातळीवर प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यात असणार्‍या त्रुटी दूर करून ही कामे मंजूर करण्यासाठी जलसंपदा विभागाकडून एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्या त्या यंत्रणांकडून ही कामे मंजूर होण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील जलसंपदा विभागातंर्गत असलेले प्रकल्प मार्गी लागतील.

- Advertisement -

किकवीला सुधारित मान्यता मिळणे आवश्यक:भुजबळ

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यास नाशिक जिल्ह्यातील ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पाअंतर्गत असलेली दिंडोरी तालुक्यातील धोंडाळपाडा, ननाशी, मांजरपाडा (देवसाने), गोळशी महाजे यांसह इतर प्रवाही वळण योजना, तसेच पुणेगाव दरसवाडी आणि दरसवाडी-डोंगरगाव कालवा विस्तारीकरण आणि ओझरखेड डावा कालव्याची अपूर्ण कामे मार्गी लागतील. कळमुस्ते, चिमणपाडा, अंबड, कापवाडी या प्रवाही योजनांना प्रशासकीय मान्यता तर नाशिक शहराच्या भविष्यातील पाण्यासाठी किकवी पेयजल प्रकल्पालाही सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे अत्यंत आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील जलसंपदाचे प्रकल्पांची कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, अशी मागणीदेखील पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केली.

गोदावरी खोर्‍याची तूट भरून काढा

पार गोदावरी उपसा जोड योजनेमुळे पूर्वेकडे वाहून जाणारे पाणी पश्चिमेकडे गोदावरी खोर्‍यात आणले जाणार आहे. या योजनेत धरणे एकमेकांशी नैसर्गिक उताराने बोगदा व बंद नलिकांद्वारे जोडून मध्यवर्ती धरणाच्या पाणीसाठ्यातून पाण्याचा उपसा करण्याचे नियोजन आहे. सर्व धरणे एकमेकांस समान संचय पातळीत जोडण्यात येणार असल्यामुळे या सर्व साठ्यांचे एकात्मिक जलनियोजन त्यामुळे शक्य होणार आहे. गोदावरी खोर्‍यातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी पार-गोदावरी उपसा जोड योजना क्रमांक ३ व ४ मंजूर कराव्यात, अशी मागणीही भुजबळ यांनी केली.

- Advertisement -

 

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -