नर्सेस भरती प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार

खासदार हेमंत गोडसे यांचे युनायटेड नर्सेस असोसिएशनला आश्वासन

नाशिक : नोकरीसाठी राज्यातील स्थानिक नर्सेसला प्राधान्य द्या, अशी मागणी करत युनायटेड नर्सेस संघटनेनी खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन दिले. नर्सेस भरती प्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून स्थानिक नर्सेसला प्राधान्य देण्याची विनंती करु, असे आश्वासन खासदार गोडसे यांनी संघटनेला दिले.
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचनालयाने केरळमधून डॉक्टर्स व नर्सेसची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील नर्सेस भूमिपुत्रांना डावलून केरळ येथून नर्सेसची मागणी करणार्‍या सरकार आणि कोविड नोडल अधिकार्‍यांचा नर्सेस संघटनेनी तीव्र निषेध केला. महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर बेरोजगारी असताना वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचनालयाने दुटप्पी भूमिका घेत केरळकडून नर्सेस मागवून महाराष्ट्रातील नर्सेसच्या पोटावर पाय देण्याचे काम करत आहे. राज्यभरात खूप सार्‍या उच्चशिक्षित चांगल्या नर्सेस असताना सरकारने केरळकडून मागणी का केली? असा प्रश्न नर्सेस संघटनेनी उपस्थित केला आहे. यावर खासदार हेमंत गोडसे यांनी तत्काळ वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठवले. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून यावर सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. याप्रसंगी युनायटेड नर्सेस असोसिएशनचे अध्यक्ष अजय मराठे, गोकुळ शेळके, अविनाश पवार, हेमंत पवार, स्नेहल तायडे, अश्विनी कदम, सोनाली घोडके, निखिल वानखेडे आदी उपस्थीत होते.