खुशखबर : बांग्लादेश सरकारने कांदा आयात बंदी उठवली

बांग्लादेशमधील कांदा निर्यात आलेख

  • २०१७-१८ – ३ लाख ३३ हजार मे.टन -५९९ कोटी
  •  २०१८-१९- ५ लाख ७८ हजार मे.टन -१०५८ कोटी
  •  २०१९-२०- २ लाख ५९ हजार मे.टन -५५० कोटी
  •  २०२०-२१- ५ लाख ५२ हजार मे.टन -७५५ कोटी
  •  २०२१-२२- ६ लाख ५८ हजार मे.टन -१३०१ कोटी

लासलगाव : निर्यातक्षम कांद्यासाठी जगात भारताचे स्थान अव्वल आहे. मात्र, कांदा निर्यातीबाबतचे दीर्घकालीन धोरण नसल्याने अनेक परकीय बाजारपेठा भारतावर गमावण्याची वेळ आली आहे. बांगलादेश सरकारने गेल्या तीन महिन्यांपासून कांदा आयात बंदी केल्याने भारताला याचा मोठा फटका बसलेला होता. मात्र, बांग्लादेशमधील ढाका, पभना, फरदापूर जिल्ह्यामध्ये किरकोळ बाजारामध्ये कांद्याने ४० ते ४५ रुपये किलोची सरासरी ओलांडली आहे. तसेच बकरी ईद सणामुळे कांदा मागणी वाढेल याचा अंदाज आल्याने बांग्लादेशमधील राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण विभागाचे महासंचालक एएचएम सफीक झमान यांनी परिपत्रक काढून कांद्यावरील आयात बंदी हटवली आहे.

देशातून होणार्‍या एकूण निर्यातीत जवळपास २५ टक्के वाटा हा बांग्लादेशचा आहे. मागील काही वर्षापूर्वी बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारत सरकारला विनंती करून सरकारने लादलेली निर्यातबंदी हटवण्याची मागणी केली होती. मात्र, भारतीय स्थानिक बाजारामध्ये किरकोळ कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने केंद्र सरकारने कांद्यावरील लावलेली निर्यातबंदी हटवली नव्हती. यामुळेच बांग्लादेश सरकारने एप्रिल महिन्यात हेतूपुरस्सर आयात बंदीचा निर्णय घेतला होता. बांग्लादेशच्या आयात बंदीमुळे भारतीय कांदा कोंडीत सापडला होता. त्यामुळे भारतीय कांदा निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, बांग्लादेशची सीमा पुन्हा भारतीय कांद्यासाठी खुली झाल्याने कांदा दरामध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा असल्याचे नाशिक येथील कांदा निर्यातदार व्यापारी विकास सिंग यांनी बोलताना सांगितले.

नाशिक जिल्ह्यात २ लाख १६ हजार हेक्टरवर उन्हाळ कांद्याचे शेतकर्‍यांनी उत्पादन घेतले आहे. सध्या बाजार समितीमध्ये कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गाने कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता. निर्यात निर्यातक्षम कांदा म्हणून ओळख असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या उन्हाळ कांद्याला कमीत कमी ५५१ रुपये, सरासरी १३७५ रुपये तर जास्तीत जास्त १८५१ रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. बांग्लादेश सरकारच्या आयात खुली करण्याच्या या निर्णयाने स्थानिक बाजारपेठांमधून उन्हाळ कांद्याच्या भावात किलोला आणखी २ ते ३ रुपयांनी वाढ होण्याची चिन्हे आहेत.

नाशिक जिल्ह्यातून कांदा आणि इतर शेतमालाचा निकस होण्यासाठी सुरू असलेली किसान रेल्वे अचानक बंद केल्याने कांदा निकस होण्यात अडथळा येत आहे. शेतकर्‍यांच्या मालास व्यापक बाजारपेठ मिळून, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने किसान एक्सप्रेस सुरू केली होती. या एक्स्प्रेसमुळे शेतकर्‍यांचा नाशवंत माल कमी दरात थेट जात असल्याने चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, अचानक किसान रेल्वे बंद झाल्याने शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे. त्यामुळे किसान रेल्वे पुन्हा सुरू होण गरजेचे आहे. : शेखर कदम,शेतकरी कातरणी

 

भारतापेक्षा पाकिस्तानचा नवीन कांदा किलोला ४ ते ५ रुपयांनी महाग असल्याने आखाती देशांमध्ये सध्या उन्हाळ कांद्याची चलती आहे. अशातच, बांगलादेशने कांद्याची आयात सुरू होण्याची नोटिफिकेशन काढल्याने कांदा दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे.: विकास सिंघ, कांदा निर्यातदार व्यापारी, नाशिक