घरमहाराष्ट्रनाशिकचुंबकत्वाचा दाव्याने व्यवस्थेला घाम

चुंबकत्वाचा दाव्याने व्यवस्थेला घाम

Subscribe

विज्ञानाची कसोटी चिकटवली अन् दावा फोल

कोविशिल्ड लस घेताच शिवाजी चौकातील अरविंद सोनार या ज्येष्ठ नागरिकाच्या अंगात चुंबकत्व संचारल्याचा प्रकार पुढे येताच गुरुवारी (दि. १०) दिवसभर केवळ याच विषयाचा काथ्याकूट सुरू होता. सकाळपासून विविध माध्यमांच्या प्रतिनिधी या मॅग्नेटिक मॅन अर्थात अरविंद सोनार यांच्या घरी तळ ठोकून होते. काहींनी तर चक्क सूर्यग्रहणाशी संबंध जोडत चुंबकीय शक्तीला नमस्कार केला. या प्रकारामुळे लसीबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या व्यावसायिकाच्या घरी जाऊन सत्यशोधन केले. दिवसभरात अंनिससह वैद्यकीय तज्ज्ञांनी विज्ञानाच्या कसोटीवर वस्तु अंगाला चिकटत असल्याचा दावा फोल ठरवला. अर्थात, निर्धास्तपणे लसीकरण करण्याचा संदेशही त्यातून आपसूक दिला गेला. दरम्यान, या संदर्भातील वृत्त दिवसभर चर्चेत राहिल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनास दिले.

यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध होताच सोनार यांच्या घरी बघ्यांची दिवसभर गर्दी होती. अर्थात कथित चुंबकत्वामुळे आपल्याला कोणताही त्रास होत नसल्याचे सोनार यांनी स्पष्ट केले. लस घेतल्यानंतर आपल्या शरीरात टॉनिक घेतल्याप्रमाणे चैतन्य संचारल्याचे त्यांनी सांगितले. गैरसमज पसरवण्याचा त्यांचा कोणताही हेतू नसला तरी लसीकरणाच्या प्रक्रियेला यातून बाधा निर्माण होऊ नये म्हणून महापालिकेच्या वैद्यकीय पथकानेही सोनार यांच्या घरी भेट देऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली. वैद्यकीय अधिकार्‍यांनी, हा प्रकार म्हणजे वैद्यक शास्रासाठी आव्हान असून यावर संशोधन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सोनार यांनी ज्या खासगी हॉस्पिटलमध्ये लस घेतली, त्या लसीच्या उत्पादन बॅच नंबरवरून त्या नंबरची लस ज्यांनी घेतली त्यांच्यावर काही परिणाम झाला आहे का, याची चौकशी केली जाणार असल्याचेही वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकार्‍यांनीही वैद्यकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली. दुसरीकडे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक तात्याराव लहानेंनाही या प्रकाराची दखल घेत यात कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करावे लागले. त्यानंतर मात्र शहराच्या वेगवेगळ्या भागातून इतरही व्यक्तींनी वस्तू चिकटत असल्याचा अनुभव घेतला आणि तसे व्हिडिओ प्रसारित झाले. ‘माय महानगर’ने डॉ. तुषार गोडबोले यांच्या विशेष व्हिडिओतून ही बाब सर्वसाधारण असल्याचे प्रात्यक्षिकांसह दाखवून दिले. त्यानंतर कालपासून सुरू झालेल्या चुंबकत्वाच्या चर्चेचे वादळ अखेर सायंकाळी थंडावले.

- Advertisement -

घरोघरी भांडी, नाण्यांचे प्रयोग

नुकत्याच कोरोनाची लस घेतलेल्या अनेकांनी स्वतःच्या शरीराला चमचे, सांडशी, पकड, ताट या भांड्यांसह नाणी चिटकवण्याचा प्रयत्न केला. त्यातील ज्यांच्या अंगाला ही भांडी चिटकली त्यांनी माध्यमकर्मींना याबाबत माहितीही कळवली.

लसीचा डोस आणि स्टिल शरीराला चिकटण्याचा काहीही संबंध नाही. आजवर कोट्यवधींच्या संख्येत कोविशिल्डचे डोस दिले गेले आहेत. परंतु असा अनुभव आलेला नाही. संबंधितांना लोखंड चिकटत असते तर चुंबकत्वाच्या बाबतीत विचार होऊ शकला असता. परंतु स्टिलसह अन्य धातूही चिटकत असल्याने त्यांना त्वचेचा विकार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी सिव्हिल हॉस्पिटल किंवा डॉ. वसंतराव पवार हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करुन घ्यावी. घामामुळे वस्तू चिटकत असाव्यात.
– डॉ. तात्याराव लहाने, वैद्यकीय शिक्षण संचालक

लसीत चुंबकत्व येण्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. शरीरातील घामाच्या ग्रंथींमुळे हे होऊ शकते. ओलसर झालेल्या त्वचेवर सपाट पृष्टभाग असलेली वस्तू चिकटू शकते. परंतु हाताला पावडर लावून त्यानंतर वस्तू चिटकवण्याचा प्रयत्न केला तर त्या चिटकत नाहीत. होकायंत्र जर त्या व्यक्तीजवळ नेले तर सुई फिरायला हवी. पण तसे होत नाही. त्यामुळे लसींबद्दल गैरसमज करु नयेत.
– डॉ. तुषार गोडबोले, हार्मोेनरोग तज्ज्ञ

- Advertisement -

महाराष्ट्र अंनिसने केले सत्यशोधन

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सोनार यांच्या घरी जाऊन यामागील सत्यशोधन करण्याचा प्रयत्न केला. चमचे, नाणे, उचटणे अशा वस्तू सोनार यांच्या चेहर्‍यापासून मानेपर्यंत तसेच हाताच्या त्वचेवर चिकटतात असे दिसून आले. मात्र, शरीराच्या त्वचेतील दमटपणा आणि वस्तूंच्या बाह्य पृष्ठभागावरील सूक्ष्म खाचखळगे यामुळे हा प्रकार होत असल्याचे त्यांचे लक्षात आले. मनुष्याच्या त्वचेचा पापुद्रा हा पातळ असतो. थोडयाशा दाबाने हवेचा दाब कमीत कमी झाल्यावर त्वचा आणि ती वस्तू एकमेकाला चिकटतात. मात्र सुरीसारखी गुळगुळीत सपाट पृष्ठभाग असलेली वस्तू चिकटत नाही, असे दिसून येते. हे कुणीही करून पाहू शकते. एवढेच नव्हे, तर समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठे ताटदेखील त्वचेचा चिकटत असल्याचे दाखवले. तशा प्रकारचे व्हिडिओ तयार करून, ते तत्काळ प्रसारीत केलेले आहेत. तेव्हा लसीकरणामुळे अंगामध्ये चुंबकत्व निर्माण होते, याच्यावर कुणीही विश्वास ठेवू नये. प्लास्टिकची वस्तूसुद्धा अंगाला चिटकते, यामुळे चुंबकत्व निर्माण झाले हा दावा फोल ठरतो. खुद्द त्या व्यक्तीनेही तसा दावा केलेला नाही. उलट यामागचे शास्रीय कारण शोधावे असा आग्रह धरला आहे. आरोग्य विभागानेही याबाबत वैद्यकीय सत्य लवकरात लवकर समाजापुढे आणावे आणि लसीकरणाबद्दल कोणीही अफवा पसरू नये, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे, नितीन बागूल यांनी केले.

अभ्यासकांचे निष्कर्ष

  • शरीरातील घामामुळे वस्तू चिटकतात
  • वस्तूंच्या बाह्य पृष्ठभागावरील सूक्ष्म खाचखळग्यांत हवेचा दाब तयार होऊन वस्तू चिटकतात
  • टाल्कम पावडर अंगाला लावून वस्तू चिटकवण्याचा प्रयत्न केल्यास त्या चिकटणार नाहीत
  • डोंबार्‍याच्या खेळात नाणे अशाच पद्धतीने कपाळाला चिटकवून तारेवरुन चालण्यात येते
  • मंदिरातील प्रदक्षिणा मार्गाच्या मध्यावर अशाच पद्धतीने भिंतीला नाणे चिटकवले जातात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -