घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिकेची कृपा; हॉटेल, स्विमिंग टँकला फुकटात पाणी

महापालिकेची कृपा; हॉटेल, स्विमिंग टँकला फुकटात पाणी

Subscribe

व्यावसायिकांकडून होत असलेल्या पाणी चोरीस महापालिका प्रशासनाचाही दुजोरा; सर्वपक्षीय नगरसेवक संतप्त

नाशिक पाणी कपातीचा वरवंटा फिरवला जात असताना उंची हॉटेल्सवर मात्र प्रशासनाची मेहरनेजर असल्याचे शुक्रवारी झालेल्या महासभेत स्पष्ट झाले. शहरातील काही उंची हॉटेल्स आणि त्यांच्या जलतरण तलावांना अनधिकृतपणे पाणी दिले जात असून त्यामुळे प्रत्यक्ष सोडण्यात येणारे पाणी आणि त्याच्या देयकात तफावत आढळून येत असल्याचा धक्कादायक आरोप माजी सभागृहनेते सुधाकर बडगुजर यांनी महासभेत केला. विशेष म्हणजे पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी अशा पाणीचोरीस दुजोरा दिल्याने आता प्रशासन संबंधित हॉटेलमालक आणि अशा चोरीकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात ‘पाणीबाणी’ची परिस्थिती असताना पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी स्पॉटवर व्हिजीट करीतच नसल्याचे सांगत गुरुमित बग्गा यांनी अधिकार्‍यांना केवळ निविदा मंजुरीतच रस असल्याचे नमूद केले. शहरातील सर्व्हिस स्टेशन बॉटलींग प्लांट सुरूच असून प्रशासन त्यांच्यावर कारवाई करण्याचे सोडून कमी दाबाने पाणीपुरवठा करून सर्वसामान्यांना वेठीस धरत असल्याचे ते म्हणाले. रहिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक कारणांसाठी १३२ दशलक्ष घनफूट पाणी प्रति महिन्याला वापरले जाते. पाणी आरक्षण नऊ महिन्यांसाठीचे असते. म्हणजेच प्रती वर्षाला ११८८ दलघफू पाण्याचे बिल निघणे गरजेचे आहे.

- Advertisement -

प्रत्यक्षात ते ३४३५ दलघफू इतक्या पाण्याचे निघते. मग ६६ टक्के पाणी जाते कोठे? त्यातील २० टक्के गळती पाणीपुरवठा व्यवस्थेतून होते. १० टक्के पाणी उद्याने, समाजमंदिरे, स्टॅण्ड पोस्ट आदींसाठी वापरले जाते. तरीही ३५ टक्के पाण्याची गळतीचा हिशेब जुळत नाही. एकतर बिलांमध्ये घोळ करून ही आर्थिक गळती केली जाते किंवा नळ जोडणीशिवाय वापरात येणारे पाणी ३५ टक्यांपर्यंत असू शकते. प्रशासनाने शोध मोहीम सुरू केल्यास ही गळती कमी होऊ शकते व त्यातून सुमारे ८ ते ९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असेही बग्गा म्हणाले. सुधाकर बडगुजर यांनी हॉटेल्समधील अनधिकृत पाण्याच्या वापराचा मुद्दा उपस्थित केला.

पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता डॉ. संदीप नलावडे यांनीही त्यास दुजोरा देत ही गळती रोखणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. हेमलता पाटील यांनीही पाणीगळती कमी करण्याची सूचना करतानाच गंगापूर धरणात खेकडे वाढले असतील तर त्यावर उपाययोजना करावी असा सत्ताधार्‍यांना टोला लगावला. दिनकर आढाव यांनी नाशिकरोड भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. शिवकृपा कॉलनीत पुरेशा दाबाने पाणीपुरवठा न झाल्यास महापालिकेवर हंडा मोर्चा काढू असा इशारा पुनम धनगर यांनी दिला.

- Advertisement -

खैरेंकडून आयुक्तांचा निषेध

काँग्रेस गटनेते शाहू खैरे महासभेत बोलत असतानाच आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सभागृह सोडल्याने खैरे संतप्त झाले. त्यांनी आयुक्तांचा निषेध करीत अशा बेजबाबदार अधिकार्‍यांमुळे पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याचे त्यांनी सांगितले. महापालिकेत पुरेसे व्हॉल्व्हमन आहेत; परंतु अधिकारी आपले काम करीत नसल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होतो, असेही ते म्हणाले.

डेमसे यांचा आक्रमक पवित्रा

प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेवक सुदाम डेमसे यांनी आक्रमक भूमिका घेत पाथर्डी आणि गावठाण परिसरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नसल्याने जनतेचे हाल होत असल्याचे स्पष्ट केले. या भागाला पुरेशा दाबाने पाणीपुरवठा न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा इशाराही डेमसे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -