पोलिसांत तक्रार दिल्याने आजोबांचा खून करणारा नातू गजाआड

दिशाभुलीसाठी साखळीने बांधून मृतदेह फेकला दुसर्‍या हद्दीत

आजोबांनी आपल्याबद्दल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून नातवाने त्यांचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी नातवाने आजोबांचे डोळे, नाक, तोंड, डोके, दोन्ही हात चिकटपट्टीने बांधून आणि लोखंडी साखळीने बांधून पुरावा नष्ट करण्यासाठी नाल्यात फेकले. प्राथमिक तपासात हा प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी नातवाला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चारचाकी वाहन जप्त केले आहे. रघुनाथ श्रावण बेंडकुळे (७०, रा. धोंडेगाव, ता. नाशिक) असे मृत्यू झालेल्या आजोबांचे नाव आहे. तर किरण निवृत्ती बेंडकुळे (२३) असे नातवाचे नाव आहे.

नातवाच्या त्रासाला कंटाळून आजोबांनी एक महिन्यापूर्वी हरसूल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग अनावर झाल्याने किरणने रविवारी (दि.११) रात्री घराबाहेर झोपलेल्या आजोबांच्या डोळे, नाक, तोंड, हाताला चिकपट्टी लावली व लोखंडी साखळीने बांधून मृतदेह मारुती ओमनी (एमएच १५-इबी ३९१९)ने धोंडेगाव येथून ओढा शिवारात नाशिक-औरंगाबाद महामार्गावर वैष्णवी ढाब्याच्या समोरील नाल्यात टाकला. दुसर्‍या दिवशी ओढाच्या नाल्यात एका वृद्धाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील गजानन भोर यांनी आडगाव पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणत ओळख पटवली. मृतदेह रघुनाथ श्रावण बेंडकोळी (रा. धोंडेगाव, ता. नाशिक) असल्याचे समजले. पोलिसांनी संशयावरुन नातू किरणकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मृतदेह नेताना पोलीस गेले कुठे?

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी पोलीस दिवसरात्र गस्त घालत आहेत. मात्र, किरण आजोबांचा मृतदेह धोंडेगाव ते आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील ओढा शिवारात आणेपर्यंत एकाही पोलिसांनी त्याला हटकले नाही, हे विशेषच. किरणने आजोबांचा मृतदेह कोणत्या रस्त्याने आणला, त्याने या परिसरातच हा मृतदेह का फेकला, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

नातवाला लागत नव्हती झोप

आजोबा मनोरुग्ण असल्याने किरण त्यांना घराबाहेर जावू देत नव्हता. त्यातून आजोबांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. राग अनावर झाल्याने त्याने त्यांचा खून केला. त्यानंतर त्याला झोप लागत नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

आडगाव पोलिसांना १० हजार बक्षीस

मृताची कोणतीही ओळख नसताना आणि घटनास्थळी कोणताही पुरावा नसताना आडगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी गुन्हा उघडकीस आणला. त्यानिमित्त पोलीस आयुक्तालयातर्फे १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे यांनी सांगितले.