मेळाव्यात साजरा होणार आजी-आजोबांचा ‘व्हॅलेंटाईन डे’

लायन्स क्लब नाशिक पंचवटीच्या वतीने व्हॅलेंटाईन दिवसाच्या निमित्ताने १४ फेब्रुवारीला सातपूर येथील निवेक सभागृहात सकाळी ११ वाजता एक अनोखा आजी-आजोबा स्नेहमेळावा होणार आहे.

आजी-आजोबा हे घराला खरे घरपण देणारे आहेत. प्रेमाचा दिवस म्हणून जरी तरुणाई व्हॅलेंटाईन डे साजरा करीत असली तरीही प्रेम या शब्दाला केवळ तरुणांपर्यंतच मर्यादीत ठेवणे योग्य नाही. प्रेम हे कोणत्याही वयात अबाधित असते. या दिवशी आजी-आजोबांचा सन्मान करुन त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न मेळाव्यातून करण्यात आला आहे.
आजी-आजोबा हे घरातील संस्कार आहेत आणि तेच घराला खरे घरपण देणारे आहेत. आजच्या पिढीने १४ फेब्रुवारीला व्हॅलेंनटाईन डे साजरा करत तारुण्याची वेगळीच लहर दाखवला सुरुवात केली आहे. पण आजी आजोबा ह्या पिढीमध्ये हा उत्साह, संस्कार सोबत दिसून येतो. याच उत्साहाची उधळण करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असे आयोजक स्मिता यंदे व वैद्य विक्रांत जाधव यांनी सांगितले. कोरोना काळात या आजी-आजोबांना स्वत:कडे लक्ष देऊन घरी बसावे लागले. त्यानंतर त्यांना बाहेरच पडायला मिळाले नाही. ही बाब लक्षात घेत हा मेळावा भरवण्यात येणार आहे. लायन्सचे झोन चेअरमन रितू चौधरी व रिजन चेअरमन राजेंद्र पगार हेदेखील यावेळी उपस्थित असतील.

असे असेल स्वरुप

मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड करणार आहेत. यावेळी प्रा. डॉ. वृंदा भार्गवे यांचे व्याख्यान होईल. मेळाव्यात वैद्य विक्रांत जाधव व नीलिमा जाधव आजी आजोबांसाठी आरोग्याच्या खास बाबी आपल्या सत्रा मध्ये सांगणार आहेत. आजीआजोबांना त्यांचे कलागुण मांडण्यासाठी विशेष वेळ ठेवला आहे.यावेळी उखाणा स्पर्धा घेण्यात येणार आहे. मेळाव्यात उदय पाटील व राजेश अक्कर हे आठवणीतील गाणी म्हणणार असल्याची माहिती अध्यक्ष सुनील देशपांडे, अरुण अमृतकर, सचिव सुजाता कोहक यांनी दिली.