कोरोनामृतांच्या ३०४ वारसांच्या खात्यात अनुदान जमा

तहसीलदारांचे संमतीपत्र आवश्यक

नाशिक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोविड-19 या आजाराने मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सूचित केले आहे. त्याअनुषंगाने अर्ज मागवण्यात आले होते. नाशिक जिल्ह्यात 304 मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येक 50 हजार रुपये जमा झाले आहेत. येणार्‍या काळात ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांच्या खात्यातही ही रक्कम लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

जिल्ह्यात एकूण 8 हजार 772 कोरोना मृतांची नोंद आहे. मात्र, तब्बल 12 हजार 765 वारसांना या सानुग्रह अनुदानासाठी अर्ज केल्याचे समजते. त्यात अनेकांनी दोन-दोनदा अर्ज केलेत. तर अनेक मृत्यूची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे या वाढत्या अर्जांनी कोरोना बळीचा आकडाही नंतर वाढण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कोरोनाने मृत झाला असेल, तर त्याच्या नावावरचे सानुग्रह अनुदान मिळावे म्हणून एकपेक्षा जास्तही अर्ज येऊ शकतात. हे लक्षात घेता अनुदान मिळवण्यासाठी आता वारसांना तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले संमतीपत्र बंधनकारक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, मृत कोविड रुग्णांच्या वारसांना मिळणार्‍या आर्थिक मदतीबाबत एका समितीची स्थापना केली. त्यात निवासी उपजिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे प्रतिनिधी आहेत. ही समिती मदत देण्याबाबतच्या सार्‍या प्रकरणांवर करडी नजर ठेवत आहे.