घरमहाराष्ट्रनाशिकवाढत्या थंडीने द्राक्ष निर्यातदार चिंतित

वाढत्या थंडीने द्राक्ष निर्यातदार चिंतित

Subscribe

आज नाशिकचा पारा ७.२ अंश सेल्सिवर स्थिरावला तर निफाड तालुक्यात ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

नाशिक: वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्याला थंडीचा चांगलाच तडाखा बसला असून याचा परिणाम जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांना सोसावा लागत आहे. गेल्या सप्ताहापासून निफाड तालुका गोठल्याने द्राक्ष बागांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घासही हिरावला जाण्याच्या भितीने द्राक्ष उत्पादक धास्तावले आहेत. आज नाशिकचा पारा ७.२ अंश सेल्सिवर स्थिरावला तर निफाड तालुक्यात ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

आधीच दुष्काळी स्थिती त्यात कांद्याला कवडीमोल भाव मिळत असतांना आता वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादकांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. थंडीचा पारा घसरल्याने परिपक्व द्राक्षमणी तडकून नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. द्राक्षपंढरी म्हणून ओळखल्या जाणारया ओझर, पिंपळगाव, उगाव, शिवडी, सोनेवाडी भागात द्राक्षबागांत दवबिंदूमुळे बर्फाची झालर तयार झाली आहे.

- Advertisement -

निफाड तालुक्यात पारा १.८ अंशाच्या खाली आल्याने नागरिकांसह शेतकर्‍यांना गारवा चांगलाच जाणवत आहे. वाढत्या थंडीचा विपरीत परिणाम जिल्ह्यातील द्राक्षबागांवर जाणवू लागला असून द्राक्षमण्यांना तडे जाणे, वाढ खुंटणे, द्राक्ष कुजणे, झाडांची मुळे चोक-अप होणे, द्राक्षघडात साखर उतरण्याची प्रक्रिया पूर्णतः थांबणे अश्या समस्यांना शेतकर्‍यांना तोंड द्यावे लागत आहे. थंडीपासून बागा वाचविण्यासाठी शेतकरी मध्यरात्री बागेत शेकोटी पेटवून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

तसेच पहाटे उठून द्राक्षबागांना ठिबक पद्धतीने पाणी देत बागांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न करत आहेत. द्राक्ष बागांचे नुकसान झाल्यास याचा परिणाम द्राक्ष निर्यातीवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. शहराचा पारा ७.२ अंशावर स्थिरावला तर अहमदनगरमध्ये पारा चांगलाच घसरला असून ४.६ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -