पुन्हा गुलमोहर कोसळला

मनपा प्रशासन अजून एखादा जीव जाण्याची वाट बघतय का ?

नाशिक : शहरात विदेशी प्रजाती असलेली गुलमोहराची झाडे उलमळून पडण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यातून काही दिवसांपूर्वी एका तरुणांचा जीवही गेला आहे. अशीच अजून एक घटना नवीन नाशिक भागातील अश्विन नगर येथील राजे संभाजी स्टेडियमच्या गेट समोर घडली आहे.

राजे संभाजी स्टेडियमच्या गेट समोरील डिव्हाईडरवर असलेले गुलमोहरचे झाड कोसळले आहे. सुदैवाने जेव्हा झाड कोसळले त्यावेळी त्याठिकाणी वर्दळ कमी अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकली असती. राजे संभाजी स्टेडियम मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी अनेक नागरिक जॉगिंग, शतपावली, व्यायाम करण्यासाठी येत असतात, तसेच स्टेडियमच्या गेट समोरील रस्ता अंबड एमआयडीसीकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्याने कामगारांच्या वाहनांचीही वर्दळ या रस्त्याने होत असते.

गुलमोहर धोकेदायकच

काही वर्षांपूर्वी शहरात मनपा प्रशासनाने हजारोंच्या संख्येने गुलमोहराच्या झाडांची लागवड करण्यात आली होती. तस बघता गुलमोहर हे विदेशी प्रजातींचे झाड आहे. हे झालं निसर्ग, मानव, तसेच पशु-पक्ष्यांना कुठल्याही प्रकारे लाभदायी नाही. तसेच ते झाड अतिशय कमजोर असते, त्याची मूळ जमिनीत खोलवर घट्ट पसरत नाही. तसेच त्या झाडाचे आयुर्मानही कमी असते, हे झाड कधीही उलमळून पडण्याची किंवा त्याच्या फांद्या कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे असे झाड रस्त्याच्या कडेला असणे अत्यंत धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पर्यावरण प्रेमींची मागणी

यामुळेच शहरात असलेली ही विदेशी प्रजातींची गुलमोहराची झाडे तात्काळ हटवून त्याठिकाणी देशी प्रजातींची आणि पर्यावरण पूरक तसेच स्थानिक वातावरणात जगू शकतील अशी झाडे त्याजागी लावण्याची मागणी अनेक दिवसापासून केली जात आहे. यावर महानगर पालिका प्रशासन अजूनही कोणतीच हालचाल करताना दिसत नाहीये.

पावसाळ्यात वाढू शकतो धोका

भर उन्हाळ्यात जर अश्या पद्धतीने गुलमोहराची झाडे कोसळत असतील तर जेव्हा पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आणि पाऊस पडेल तेव्हा तर झाडे कोसळण्याचा धोका अधिक वाढणार आहे. यावर मनपा प्रशासन काय पाऊल उचलणार की हाही विषय दुर्लक्षित होणार हे बघणे महत्वाचं असेल.