एचएएल कामगार संघटनेच्या निवडणुकीस टाळाटाळ

माजी सरचिटणीस संजय कुटे यांचा आरोप

ओझर : येथील एचएएल कामगार संघटनेची निवडणूक घेण्यास शासनाने व जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली असली तरी व्यवस्थापनाने अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे निवडणूक जाहीर झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर कामगार संघटनेचे सरचिटणीस व व्यवस्थापन निवडणूक घेण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करत निवडणूक कार्यक्रम त्वरित जाहीर करण्याची मागणी संघटनेचे माजी सरचिटणीस संजय कुटे यांनी केली आहे.

एचएएल कामगार संघटनेचा कार्यकाळ १५ जून २०२१ रोजी संपला असल्याने संघटनेची निवडणूक घेणे क्रमप्राप्त आहे. परंतु कोरोना कारणास्तव जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून निवडणूक घेण्यासाठी परवानगी मिळत नव्हती, संघटनेचे माजी सरचिटणी संजय कुटे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करून निवडणूक घेण्यासाठी परवानगी मिळवली. तसेच संजय कुटे माजी सहचिटणीस अनिल मंडलिक व विद्यमान सहचिटणीस गिरिश वलवे यांनी निवडणूक घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचेकडे वेगवेगळ्या निवेदनाद्वारे केली असता जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी निवडणूक घेण्याची लेखी परवानगी दिली. तसेच कामगार उपआयुक्त, नाशिक यांनीसुद्धा निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आपला ग्रुपच्या वतीने संजय कुटे यांच्या तर जागृती ग्रुपतर्फे अनिल मंडलिक व विश्वास ग्रुपतर्फे गिरिश वलवे यांच्या नेतृत्वाखाली दि. १२ व १६ नोव्हेंबर रोजी त्रैवार्षिक निवडणूक कार्यक्रम लवकरात लवकर जाहीर करावा या मागणीसाठी संघटनेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

त्यावेळी विद्यमान सरचिटणीस सचिन ढोमसे यांनी आश्वासन दिले होते की, दोन दिवसात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे नाव जाहीर करण्यात येईल व ते लगेच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील पण दोन दिवसांत यापैकी काहीही झाले नाही. म्हणून विद्यमान सत्ताधार्‍यांकडून निवडणूक घेण्याबद्दलची नेमकी भूमिका समजून घेण्यासाठी व संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा मागण्यासाठी शुक्रवारी (दि. १९) दुपारी ३ वाजता संजय कुटे व अनिल मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कार्यालयावर भव्य मोर्चा नेण्यात आला. हजार ते बाराशे कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. परंतु पूर्व कल्पना दिलेली असताना सुद्धा विद्यमान सरचिटणीस कामगारांच्या मोर्चाला सामोरे न जाता निघून गेले. संघटनेच्या कार्यालयात निवडून आलेले कोणीही पदाधिकारी उपस्थित नव्हते. मोजके स्वीकृत सदस्य उपस्थित होते. यावेळी मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले.

शासनस्तरावर पाठपुरावा करून निवडणूक घेण्यासाठी परवानगी मिळवली. जिल्हाधिकारी तथा अद्यक्ष जिल्ह्या आपत्ती व्यवस्थापन यांच्या कडून निवडणूक घेण्याची लेखी परवानगी मिळाल्यानंतर कामगार उपायुक्त यांनी सुद्धा निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले.परंतु कोव्हिडच्या आड लपून विद्यमान पदाधिकारी निवडणूक घेण्यास टाळाटाळ करत आहे.
                                                                                       – संजय कुटे, माजी सरचिटणी

कामगार उपायुक्त यांच्याकडे आम्ही निवडणूक घेण्याबाबत ठराव करून कळविले आहे त्यांची येत्या दोन दिवसात भेट घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर करून निवडणूक घेणार आहोत विरोधक निवडणूकीबाबत स्टंटबाजी करीत आहे.
                                                                                   – सचिन धोमसे, चिटणीस ,एचएएल कामगार संघटना

एचएएल कामगार संघटनेचा निवडणूक कार्यकाळ 16 जून 2021 रोजी संपला असून ती निवडणूक होणे अपेक्षित होते. कोरोनाचा वाढता प्रभावामुळे संघटनेची निवडणूक झाली नाही त्यासंदर्भात निर्बंध हटल्यानंतर मी स्वत विश्वास ग्रुपच्या वतीने जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेट देऊन निवडणूक घेण्यासंदर्भात मागणी केली त्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संमती मिळाली आहे. परंतु निवडणूक घेण्यास व्यवस्थापन प्रॉडक्शनचे कारण देत नकार देत आहे. या संदर्भात मी स्वत: कामगार उपायुक्त नाशिक यांची भेट घेऊन निवडणूक घेण्यास भाग पाडणार आहे.
                            – गिरीश वलवे, सहचिटणीस,एचएएल कामगार संघटना, विश्वास ग्रुप