बाप शिकला नाही, जमिनी नाही, जातीचा दाखला आणू कुठून?

अंगणवाडीच्या अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार यांनी केली आहे.

caste certificate

श्रीधर गायधनी : मी अपंग आहे, मी भिल्ल समाजातील असल्याने बापजाद्यांकडे जागा-जमीन नाही. माझे वडील, आजोबांनी शाळेचे तोंडच पाहिले नाही, तर जातीच्या दाखल्यासाठी वाडवडिलांचे शाळेचे दाखले आणू तरी कसे. नोकरीसाठी जातीचा दाखला मिळवू कसा, असा सवाल करत आदिवासी विकास विभागाने मला न्याय द्यावा, अशी मागणी अंगणवाडी अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार यांनी केली आहे.

अंगणवाडी सेविकांसाठी जागांचे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची गुरुवारी (दि.१५) शेवटची मुदत होती. मात्र, यासाठी उमेदवारांना त्यांच्या जातीचा दाखला जोडणे बंधनकारक होते. मात्र, जाखोरी (ता.जि. नाशिक) येथील भिल्ल समाजाची पायाने ४५ टक्के अपंग सविता सोनवणे उर्फ उषा पवार अंगणवाडीत नोकरी मिळावी म्हणून गेल्या कित्येक वर्षांपासून अंगणवाडीत काम करत आहे. भिल्ल समाजाचे उदरनिर्वाहाचे साधन मासेमारी व मोलमजुरी आहे. काहींच्या नावावर जमिनी तर नाहीच, परंतु पूर्वज शिक्षण प्रवाहापासून दूर असल्याने वंचित राहिलेल्यांचे शाळेचे दाखले मिळणे शक्यच नाहीत. अशा समाजातील मुलगी शिक्षण घेऊन नोकरी करण्यासाठी प्रयत्न करणार असेल तर जातीचा दाखला आणायचा कोठून हा प्रश्न आहे.

शिक्षण आहे, अनुभव आहे, ग्रामपंचायतीने सविताला अनुभवाचे दाखले दिले, पण शासनाच्या नियमांनुसार जातीचा दाखला नसल्याने आता अपंग सविताला स्वतःच्या पायावर उभे राहण्यात मोठी अडचण झाली आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते पिंटू जगळे यांनी मदत केल्याने अर्ज दाखल केला असला तरी जातीच्या दाखल्याचा यक्ष प्रश्न सुटण्याची चिन्ह दिसत नाही.

अपंग असल्याने अंगणवाडीत गेल्या तीन वर्षांपासून काम करतेय. अंगणवाडीच्या जागा निघाल्या मी शैक्षणिक पात्रते प्रमाणे अर्ज केला. मात्र, जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वडिलांचा किंवा पूर्वजांचा शाळा सोडल्याचा दाखला पुरावा म्हणून लागतो. आता वडील, आजोबा, पणजोबा शाळेतच गेले नाही तर मी दाखला आणू कुठून? जातीचा उल्लेख एक तर शाळेच्या दाखल्यावर किंवा जमिनीच्या उतार्‍यावर असतो. जमीन नाही, बाप शाळेत गेला नाही, मी करू तरी काय..? मला आदिवासी विकास विभागाने न्याय द्यावा. – सविता सोनवणे (उषा पवार), अपंग, महिला