हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरीच; ग्रामस्थ जाणार न्यायालयात

साधुमहंतांसोबत ग्रामस्थांनी घेतली बैठक; न्यायालयात पुरावे करणार सादर

नाशिक : कर्नाटकातील किष्किंदाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी हनुमानाचे जन्मस्थळ अंजनेरी नसून, किष्किंदा असल्याचा दावा केल्यानंतर आता अंजनेरी ग्रामस्थांनीही त्याविरोधात पवित्रा घेतला आहे. रविवारी (दि.29) त्र्यंबकेश्वर येथील साधुमहंतासोबत बैठक घेत थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय या ग्रामस्थांनी घेतला आहे. न्यायालयात हनुमान जन्माचे पुरावे सादर करणार असल्याचेही या गावकर्‍यांनी सांगितले.

कर्नाटकातील किष्किंदाचे दंडास्वामी गोविंदानंद सरस्वतीजी महाराज यांनी वाल्मिकी रामायणानुसार हनुमानाचा जन्म अंजनेरीत नव्हे तर किष्किंदात झाल्याचा दावा करुन नाशिकच्या धर्मपंडितांना धर्मसभेचे आव्हान दिले आहे. याच या पार्श्वभूमीवर रविवारी अंजनेरीतील अंजनी माता मंदिरात गावकरी आणि साधूसंतांची बैठक पार पडली. ब्रह्मपुराण, स्कंद पुराणात महत्वाचा उल्लेख, विष्णू पुराण, एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण, नवनाथ भक्तीसार, त्र्यंबक महात्म्य यातही अंजनेरी हेच जन्मस्थळ म्हणून उल्लेख असल्याची यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच, गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी किल्ल्यावर यावे आम्ही त्यांना सिद्ध करून दाखवू, गावकर्‍यांनी गोविंदानंद महाराजांना आव्हान दिले आहे.

तपोभूमी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान आहे. हे सिद्ध करण्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढाईला सामोरे जावू, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. गोविंदानंद महाराज यांनी अंजनेरी गडावर यावे त्यांना हे सिध्द करुन दाखवू असे आव्हानही ग्रामस्थांनी दिले. यावेळी श्रीमहंत ठाणापती ब्रह्मगिरीजी महाराज 1008 महंत श्री सोमेश्वरानंद महाराज, पिनाकेश्वरगिरी महाराज, माजी सरपंच कमलू कडाळे, माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

गोविंदानंद महाराजांचा निषेध

गोंविदानंद महाराज यांनी केलेला दावा तथ्यहीन आहे. ब्रह्मपुराण, स्कंदपुराण, एकनाथ महाराजांचे भावार्थ रामायण, नवनाथ भक्तीसाद, त्र्यंबक महात्म्य यात अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे साधुमहंतांनी स्पष्ट केले. उपस्थितांनी गोंविदानंद महाराज यांचा निषेधदेखील केला.