घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोस्टमोर्टमनंतर संकलित केलेले धोकेदायक मानवी अवयव धुळखात पडून; ठरू शकतात घातक

पोस्टमोर्टमनंतर संकलित केलेले धोकेदायक मानवी अवयव धुळखात पडून; ठरू शकतात घातक

Subscribe

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन विभागात शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जानेवारी २०२० ते जानेवारी २०२३ या तब्बल तीन वर्षांतील सुमारे दीड हजार व्हिसेरा व डीएनए सॅम्पल धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. व्हिसेरा वेळेवर प्रयोगशाळेकडे पाठविण्याची जबाबदारी पोलिसांची असतानाही, अशाप्रकारे दुर्लक्ष करुन पोलिसांकडून एकप्रकारे पुरावाच नष्ट होत आहे.

एखाद्या महिला किंवा पुरुषाच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट किंवा संशयास्पद असेल तर, अशावेळी नेमके कारण समजावे, यासाठी शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांकडून व्हिसेरा राखून ठेवला जातो. हा व्हिसेरा जतन करतानाच, वेळेत न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवावा लागतो. अन्यथा, तर पूर्णपणे खराब होऊन जातो. मृत व्यक्तीने मद्य किंवा विषारी औषध घेतले का, बाळंतपणात माता मृत्यू प्रकरण, एखाद्याची मादक द्रव्य देऊन हत्या केली आहे का, हे जाणून घेण्यासाठी व्हिसेरा काढला जातो. इंडियन एव्हिडन्स अ‍ॅक्टनुसार व्हिसेराचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.

- Advertisement -

एखाद्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी प्रतिकार केला होता किंवा नाही, हुंडाबळीत प्रारंभी द्रवपदार्थातून औषध देऊन बेशुद्ध केले जाते आणि त्यानंतर तिला जाळण्यात येते, अशावेळी व्हिसेरा अहवालातून सत्य माहिती समोर येते. व्हिसेरा वेळेत तपासणीकरिता न देणे म्हणजे पुरावा नष्ट करण्यासारखेच असते. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात दिवसेंदिवस व्हिसेरांची संख्या वाढत असून, त्या तुलनेत व्हिसेरा वेळेत तपासणीसाठी नेण्याचे प्रमाण कमी आहे. शवविच्छेदन विभागातील एका कपाटात व्हिसेरा असलेल्या बाटल्या ठेवल्या जातात. त्या संबंधित पोलीस ठाण्यांनी घेऊन जाणे अपेक्षित आहे. नंतर त्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी देणे अपेक्षित असते. नेमके हेच होत नसल्याचे उघड झाल्याने व्हिसेरा धूळखात पडून आहेत.

पाहणीत समोर आलेले मुद्दे
  • शवविच्छेदन विभागात डॉक्टर व कर्मचार्‍यांना ड्युटी सुरु करण्यापूर्वी घ्यावा लागतो
  • व्हिसेराचा आढावा व्हिसेरा कायदेशीर पुरावा असल्याने आणि पोलीस व्हिसेरा नेत नसल्याने दुर्गंधीत होतेय वाढ
  • एखादा व्हिसेरा गहाळ झाला तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न पडलाय
  • डॉक्टर व कर्मचार्‍यांना शवविच्छेदनानंतर डॉक्टर तात्काळ देतात व्हिसेरा.
  • मात्र, पोलीस व डॉक्टरांमध्ये असमन्वय असल्याने व्हिसेरा पडलेत धूळखात
  • ज्या प्रकरणात व्हिसेरा खराब होतो किंवा गहाळ होतो अशावेळी पोलिसांचा तपास व शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालाच्या आधारे अंतिम मृत्यूबाबत मत दिले जाते.
  • परंतु, ते अचूक असेलच असे नाही कालबाह्य व्हिसेरा नष्ट करण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना देण्याची गरज.
व्हिसेरा राखून ठेवणे म्हणजे काय ?

एखाद्या व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यानंतरही मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसेल तर त्या व्यक्तीच्या शरीरातील काही भागांचे नमुने घेतले जातात. या नमुन्यांची रासायनिक प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्यातून संबंधित व्यक्तीचा मृत्यू केव्हा झाला, मृत्यूपूर्वी विषप्राशन केले होते का किंवा गळा दाबल्याने किंवा अन्य कोणत्या कारणाने मृत्यू झाला, हे स्पष्ट होते. मृत व्यक्तीचे जठर, फुप्फुस, आतडे, छातीचे हाड इ. भाग प्लास्टिकच्या बाटलीत काढून रासायनिक तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे सीलबंद करून पाठविले जातात. हा अहवाल आल्यानंतरच अंतिम मत पोलीस व डॉक्टरांकडून दिले जाते. मात्र, ज्या मृतांचा व्हिसेरा काढूनही ते सॅम्पल वेळेत प्रयोगशाळेकडे न पाठविणार्‍या पोलिसांवर जबाबदारी निश्चित करुन, त्यांचीच चौकशी करण्याची गरज आहे.

पोलिसांच्या मागणीनुसार व संशयास्पद मृतदेह असल्यास शवविच्छेदन केल्यानंतर व्हिसेरा राखून ठेवला जातो. तो घेऊन जाण्यास पोलिसांना सांगितले आहे. मात्र, पोलीस व्हिसेरा सॅम्पल घेऊन जात नसल्याने शवविच्छेदन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शिवाय, व्हिसेरा ठराविक वेळेत न नेल्याने तो कालबाह्य ठरत आहे. : डॉ. हेमंत घांगळे, वैद्यकीय अधिकारी, शवविच्छेदन विभाग, जिल्हा रुग्णालय

पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्यानंतर पुढील तपासासाठी व्हिसेरा राखून ठेवला जातो. जिल्हा रुग्णालयातून कालबाह्य व्हिसेरा घेऊन जाण्याबाबत पोलीस ठाणेनिहाय पोलिसांना सूचना दिल्या जातील. : प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त, गुन्हे

- Advertisement -
कालबाह्य व्हिसेरा जैविक कचरा

व्हिसेरा काढल्यानंतर लगेचच त्याचे विघटन सुरू होते. ते टाळण्यासाठी त्यात रसायन टाकले जाते. त्यामुळे अधिकाधिक तीन महिने त्याचे जतन करणे शक्य होते. मात्र, त्यानंतर केलेल्या व्हिसेराच्या तपासणीत काहीही निष्पन्न होत नाही. यामुळे मृत व्यक्तीचा घातपात झाला असेल तरीही त्याला न्याय मिळण्याची शक्यता धूरस होते. त्यामुळे यंत्रणांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -