घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रचोरी करायला गेला अन् जीव गमावला

चोरी करायला गेला अन् जीव गमावला

Subscribe

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरुन लोखंडी गजाची चोरी करत असताना एकजण खाली पडला. विशेष म्हणजे, रुग्णालयात नेण्यासाठी रिक्षा मिळत नसल्याने जखमी अवस्थेत त्याला साथीदार भितीपोटी पळून गेल्याचे त्याच्या मृत्यूनंतर झालेल्या पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (दि.२०) पहाटे ५ वाजता व्दारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस भागात घडली. चंदू सामा रहासे ऊर्फ भोला (वय ३२, मूळ रा. मांडवी खुर्द, नंदूरबार) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२०) सकाळी 8.30 वाजता रात्रगस्त अधिकारी पोलीस उपनिरीक्षक धमेंद्र पवार पेट्रोलिंग करत असताना मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतविनायक इमारतीसमोर व महिंद्रा ट्रॅक्टरसमोरील पोल क्रमांक ७४ दरम्यान झाडाझुडपांमध्ये एक अनोळखी मृतदेह आढळून आला. ही बाब पवार यांनी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना देताच तेसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता डोक्यास वर्मा घाव झाल्याने रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह असल्याचे दिसून आले. पोलिसांनी मृताची ओळख पटवण्यासाठी तपास सुरु केला. मृत व्यक्तीचा मित्र शितळादेवी मंदिर परिसरात राहत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता मृतदेह चंदू रहासे याचा असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

- Advertisement -

चंदू रहासे व त्याचा साथीदार सोमवारी पहाटे ५ वाजता ट्रॅक्टर हाऊसजवळील बांधकाम सुरु असलेल्या स्टार लाईन इमारतीमध्ये लोखंडी गज चोरी करण्यासाठी गेले होते. इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरुन चंदू रहासे खाली पडला, अशी माहिती तपासात समोर आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी भेट पाहणी केली असता पोलिसांना इमारतीच्या आवारात व कंपाऊंडलगत रक्त पडलेले दिसून आले.

प्रथमदर्शनी पोलिसांनी खुनाचा प्रकार वाटत होता. मात्र, चौकशीत खून नसल्याचे समोर आले आहे. चंदू रहासे व त्याचे साथीदार स्टार लाईन इमारतीमध्ये गज चोरीसाठी आले होते. तिसर्‍या मजल्यावरून चंदू रहासे खाली पडला. त्यानंतर त्याचा साथीदार जखमी अवस्थेत असलेल्या चंदू रहासे यास औषधोपचारासाठी रस्त्यावर रिक्षाची वाट पाहत उभे होते. मात्र, रिक्षा मिळत नसल्याने साथीदार त्यास जखमी अवस्थेत सोडून पळून गेले. त्यातच चंदू रहासेचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -