घरताज्या घडामोडीआरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा 15 जुलैपासून

आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा 15 जुलैपासून

Subscribe

वेळापत्रक जाहीर: एमबीबीएस, बीडीएस, बी.एससी नर्सिंग, आयुर्वेद व युनानीचे अंतिम वर्षातील विद्यार्थी होणार प्रविष्ट

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय विद्याशाखांच्या परीक्षा होतील की नाही याविषयीची अनिश्चितता आता संपली असून महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. येत्या 15 जुलैपासून एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयुएमएस, बीएचएमएस, बी.एससी नर्सिंगच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा होत असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर वेळापत्रकही प्रसिध्द केले आहे. यात प्रथम वर्ष व 2019 च्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेण्यास मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाने (एमसीआय) परवानगी दिली. त्याआधारे वैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, दंत विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. जयंत पळसकर, आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत देशमुख यांनी ‘एमसीआय’कडे परीक्षांची परवानगी मागितली होती. त्याआधारे परीक्षांना परवानगी मिळाली आहे; मात्र, परीक्षा केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकार राहील. विद्यार्थी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत, त्याच महाविद्यालयात या परीक्षा होतील. गावाजवळील महाविद्यालयात परीक्षा केंद्र असल्यास विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीप्रमाणे केंद्र देण्यात येणार आहे. विद्याशाखा व जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची माहिती लवकरच आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यापीठाने ऑनलाईन लेक्चर ही संकल्पना राबवली. तसेच वेबीनारच्या माध्यमातून प्राध्यापक व विद्यापीठातील अधिकार्‍यांनी समन्वय साधत परीक्षांचे नियोजन सुरु ठेवले आहे.

- Advertisement -


विद्यापीठाच्या परीक्षांचे नियोजन सुरु केले आहे. विद्यार्थ्यांना घरापासून जवळच्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्रावर आसन व्यवस्था करण्याचे काम सुरु आहे. परीक्षा केंद्र निश्चित झाल्यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे.
-डॉ.कालिदास चव्हाण, कुलसचिव (आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -