घरताज्या घडामोडीकोविडमुळे मृत झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख

कोविडमुळे मृत झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख

Subscribe

घनकचरा व्यवस्थापन विभागातील दोन कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांचा विमा संरक्षण निधी

नाशिक – जीवाची बाजी लावून कोविड काळात फ्रंटलाईन वर्करने आपली सेवा दिली. त्यात काही कर्मचार्‍यांवर काळाने घालाही घातला. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघड्यावर आले. कोविडमुळे मृत्युमूखी पडलेल्या कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजने अंतर्गत ५० लाखांचा विमा निधी मिळणार आहे. या अंतर्गतच घनकचरा व्यवस्थापन विभागातील दोन कर्मचार्‍यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाखांचा विमा संरक्षण निधी प्राप्त झाला असून, दिवाळीनंतर उर्वरित दोन सफाई कर्मचार्‍यांच्या वारसांना हा निधी मिळणार आहे.

कोविड संसर्गाच्या भितीने ज्यावेळी नागरिक घराबाहेर पडतही नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊनच्या काळात शांत झाला होता. त्याकाळात आपल्या जीवावर उदार होत महापालिकेचे फ्रंटलाईन वर्कर कार्यरत होते. आपले कर्तव्य निभावत हे कर्मचारी कोवीडशी चार हात करत होते. नागरिकांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी यातील काही कर्मचार्‍यांनी प्राणाची आहुतीही दिली. कोवीड काळात सेवेत असताना कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या फ्रन्टलाईन वर्कर, हेल्थ केअर वर्कर साठी शासनाने पन्नास लाख रुपयांचा विमा संरक्षण निधी जाहीर केला होता. नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील सफाई कर्मचारी गौतम भिवा पगारे व संतोष अर्जुन मारू यांचे कोरोना विषाणूच्या आजाराने उपचारादरम्यान निधन झाले.

- Advertisement -

शासनाने आदेश निर्गमित केलेप्रमाणे या दोन्ही कर्मचार्‍यांच्या पत्नींना प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजने अंतर्गत ५० लाखांचा विमा संरक्षण निधी थेट बँक खात्यावर जमा करण्यात आलेला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अधिपत्याखाली तसेच शासनाचे अधिकारी व मार्गदर्शनानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.कल्पना कुटे यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून त्यांच्या वारस पत्नी यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजने अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. घनकचरा व्यवस्थापन विभागातील उर्वरित दोन सफाई कर्मचार्‍यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजने अंतर्गत ५० लाखांचा विमा संरक्षण निधी दिवाळी नंतर मिळणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात महापालिकेतील फ्रंटलाईन वर्करने जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणे काम केले. दुर्देवाने त्यात पाच फ्रंटलाईन वर्करचे निधन झाले. त्यांच्या वारसांना प्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजनेंतर्गत विमा संरक्षणाचा निधी देण्यात येत आहे. यातील दोघांच्या वारसांच्या खात्यावर निधी जमा झाला आहे. उर्वरित दोन वारसांना दिवाळीनंतर निधी प्राप्त होईल.
– डॉ. कल्पना कुटे, सहायक आरोग्य अधिकारी

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -