नाशकात आजपासून हेल्मेट सक्ती

विनाहेल्मेट दुचाकीचालकास ५०० रुपये दंड,

नाशिक : शहरात गुरुवार(दि.२०)पासून हेल्मेटसक्ती केली जाणार आहे. विनाहेल्मेट दुचाकीचालकास ५०० रुपये दंड पोलीस दंड आकारला जाणार असून, दुसर्‍यांदा विनाहेल्मेट दुचाकीचालक दिसून आल्यास त्यास एक हजार रुपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. दंड न भरल्यास वाहन ताब्यात घेण्यात येणार असून, दंड भरल्यानंतरच वाहनचालकांचे वाहन ताब्यात दिले जाणार आहे.

शहरात बेशिस्त वाहनचालक हेल्मेट वापरत नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. शहरात मंगळवार (दि.१८)पासून हेल्मेटसक्ती केली जाणार होती. मात्र, वाहनचालकांना मुभा देत आता गुरुवारपासून हेल्मेटसक्ती केली जाणार आहे. शहरात १२ ठिकाणी विनाहेल्मेट दुचाकीचालकांना दोन तासांचे समुपदेशन केले जात आहे. चालकांना वाहतूक नियमांचे पुस्तकाचे वाचन करण्यास सांगितले जात आहे. त्यानंतर परीक्षा घेतली जात आहे.

१ नोव्हेंबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ या कालावधीत तब्बल १० हजार ५६१ विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. शहरात गुरुवार (दि.२०)पासून वाहतूक पॉईंट व समुपदेशन केंद्रावर विनाहेल्मेट दुचाकीचालकांचे ई चलन कार्यप्रणालीअंतर्गत ५०० दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे आता हेल्मेट परिधान करुन दुचाकी चालवावी लागणार आहे.

वर्षभरात १११ विनाहेल्मेट दुचाकीचालकांचा मृत्यू

नाशिक शहरात १ जानेवारी २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत तब्बल ११६ दुचाकीचे जीवघेणे अपघात झाले आहेत. त्यामध्ये १२४ दुचाकीचालकांचा मृत्यू झाला आहे. तर विनाहेल्मेट दुचाकी चालविल्यामुळे १११ दुचाकीचालकांचा मृत्यू झाला आहे