घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्र१ डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती; वर्षभरात ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू

१ डिसेंबरपासून हेल्मेटसक्ती; वर्षभरात ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू

Subscribe

नाशिक : शहरात गेल्या वर्षभरात झालेल्या रस्ते अपघातांत तब्बल ८३ विनाहेल्मेट दुचाकीचालकांचा दुर्दैवी बळी गेला तर, २६१ चालक कायमचे जायबंदी झाले. या वाढत्या अपघातांची दखल घेत पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी १ डिसेंबरपासून शहरात हेल्मेटसक्ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

१ डिसेंबरपासून हेल्मेटसक्तीची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. तत्कालीन आयुक्त दीपक पांडे यांनी सुरू केलेल्या नो हेल्मेट नो पेट्रोल या कारवाईची देशभरात चर्चा झाली होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर हेल्मेटसक्ती कारवाईला ब्रेक लागला. शहर व परिसरात रस्ते अपघातांत वाढ झाली आहे. जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत विनाहेल्मेट दुचाकी अपघातात ८३ चालकांचा जीव गेला. तर, २६१ चालक व पाठीमागे बसलेले कायमचे जायबंदी झाले. दुचाकीस्वार अपघातानंतर रस्त्यावर पडून डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले आहे. तसेच, दुभाजकावर डोके आपटून मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे गुन्ह्यात दाखल आहे.

- Advertisement -

वाढते अपघात व जिवितहानी टाळण्यासाठी कायद्याुसार आता दुचाकीचालकांना हेल्मेट वापर बंधनकारक आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास 500 रुपये दंडाची तरतूद आहे. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची गस्त वाढवली आहे. पोलिसांची गस्त होत असल्याने भरधाव वेगात वाहने चालविणार्‍यांना वचक बसला आहे. यामुळे महामार्गावर अपघात घटले. मृत्यूचे प्रमाणही घटले आहे.

शहरातील नागरीक कायदा व सुव्यवस्थेचे पालन करतात. वाहतूक नियमांचे पालन करण्यास शहरवासिय अघाडीवर आहेत. त्यामुळे आता दुचाकी अपघातातील जिवितहानी रोखण्यासाठी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर आवर्जून करावा, वाहतुक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे. काही दुचाकीचालक कारवाई टाळण्यासाठी रस्त्यावरील हेल्मेट घेतात. मात्र, हलक्या दर्जाच्या हेल्मेटमुळे डोक्याला गंभीर ईजा होऊ शकते. मृत्यूही होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांनी चांगल्या दर्जाच्या हेल्मेटचा वापर करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -